मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत सुरू झालेल्या कोको-कोला कंपनीच्या प्रकल्पाचं स्वागत केलं. तसेच कोका-कोला कंपनीची २०१५ मध्ये येथे येण्याची इच्छा होती, असं नमूद केलं. त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अमेरिका दौऱ्याचाही उल्लेख केला. यावेळी शिंदेंनी प्रकल्पाला विरोध करणाऱ्यांवर सडकून टीका करत ठाकरे गटाला लक्ष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकनाथ शिंदे म्हणाले, “कोका-कोला कंपनीचे देशभरात विविध ६० उत्पादनं आहेत. तेथे आज हजारो कर्मचारी काम करत आहेत. या कंपनीने २०२३ मध्ये भारतात एकूण १२ हजार ८४० कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. कोका-कोलासारखी कंपनी रत्नागिरीत उभी राहत आहे. त्यामुळे लोकांना रोजगार उपलब्ध होईल. सरकारची स्थानिकांना रोजगार देण्याची भूमिका आहे. व्यवस्थापनानेही या कंपनीत स्थानिकांना प्राधान्य दिलं पाहिजे, अशी सरकारची भूमिका आहे.”

“फडणवीसांच्या अमेरिका दौऱ्यात ठरलंही होतं, परंतु…”

“कोका-कोला कंपनीची २०१५ मध्ये येथे येण्याची इच्छा होती. त्यावेळी आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमेरिका दौऱ्यात असताना याबाबत ठरलंही होतं. परंतु नंतर नवीन सरकार आलं. त्या सरकारबद्दल मी काही सांगत नाही. सरकार बदलल्यावर काय काय अडचणी येतात आणि त्याचं कारण काय यावर मी बोलणार नाही,” असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं.

व्हिडीओ पाहा :

“फक्त राजकारणासाठी कोकणी माणसाला वापरण्याचं काम आम्ही करणार नाही”

एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “खरं म्हणजे या कोकणात जेवढं काम करता येईल तेवढं केलं पाहिजे होतं. कारण कोकणाने नेहमीच बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम केलं आहे. आमच्या सगळ्यांवर प्रेम केलं आहे. फक्त राजकारणासाठी कोकणी माणसाला वापरून घेण्याचं काम आम्ही करणार नाही, कधीही आमचं सरकार करणार नाही.”

हेही वाचा : खालच्या भाषेतील टीका किती काळ सहन करणार? एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

“बाळासाहेब ठाकरेंनी आणि आनंद दिघेंनी ते कधी शिकवलं नाही”

“इथल्या भूमीपुत्रांना मोठमोठी स्वप्ने दाखवायची, कौतुक करायचं आणि एखादा चांगला प्रकल्प आला की, त्याला विरोध करायला लावायचा, असं राजकारण आम्ही कधीही केलं नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आणि आनंद दिघेंनी ते कधी शिकवलं नाही. मात्र, ज्यांनी हे केलं त्यांच्यामुळे हा प्रकल्प इतक्या उशिरा येथे सुरू होत आहे. आपलं सरकार आल्यावर तात्काळ जे जे उद्योग महाराष्ट्रात येऊ इच्छितात त्यांना आम्ही रेड कार्पेटचे आदेश दिले,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde on coca cola ratnagiri project mention devendra fadnavis america tour pbs