‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा विवियाना मॉलमधील शो राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडला. यावेळी झालेल्या हुल्लडबाजीवरून जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या काही कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. ही अटक राजकीय दबावापोटी करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात येत होता. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विदर्भ दौऱ्यावर आहेत. मागील चार दशकांपासून रेंगाळलेल्या भंडाऱ्यातील गोसेखुर्द प्रकल्पाची मुख्यमंत्री शिंदेंनी पाहणी केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या अटकेबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना विचारण्यात आलं. “जितेंद्र आव्हाड यांच्यावरील पोलिसांची कारवाई कायदेशीर आहे. यात कोणीही राजकीय हस्तक्षेप केला नाही. नियमानेच ही कारवाई केली आहे. राजकीय सूड अथवा आकसापोटी आमचं सरकार कुठेच काम करत नाही,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा : शिंदे गटात सामील होताच गजानन किर्तीकरांचा चंद्रकांत खैरेकडून समाचार; म्हणाले, “म्हातारचाळे…”
जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
जितेंद्र आव्हाड यांनी ‘हर हर महादेव’ चित्रपट बंड पाडल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून एका प्रेक्षकाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह १०० कार्यकर्त्यांवर वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी (११ नोव्हेंबर) जितेंद्र आव्हाड यांच्यासह ११ ते १२ जणांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. शनिवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयाच्या हॉलिडे कोर्टामध्ये हजर केले असता, जितेंद्र आव्हाड यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा : “वाईट फक्त एकाच गोष्टीचं वाटतं की…”, गजानन किर्तीकर शिंदे गटात गेल्यानंतर अरविंद सावंतांचं टीकास्र!
“हे महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार नाही”
जितेंद्र आव्हाड यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत राज्य सरकावर आरोप केले आहेत. “जितेंद्र आव्हाड यांना केलेली अटक म्हणजे राज्य सरकारचे चित्रपटाला समर्थन असून इतिहासाची मोडतोड असणाऱ्या चित्रपटाला राज्य सरकार पाठीशी घालतंय. छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास आणि बाजीप्रभूंची बदनामी करण्याबरोबर महाराजांचीही बदनामी करणारा हा चित्रपट असून हे महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार नाही. या चित्रपटात विरोधात जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेशी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भक्कमपणे उभी आहे,” असे जयंत पाटील यांनी सांगितले.