Eknath Shinde On Pahalgam Terror Attack : जम्मू आणि काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज दुपारी अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात अनेक पर्यटक जखमी देखील झाले असून मृतांमध्ये महाराष्ट्रातील दोन नागरिकांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पहलगाम येथील बैसरन पर्वत रांगेच्या खोऱ्यात दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला. अनेक पर्यटकांना धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर राजकीय वर्तुळातून याचा निषेध केला जात आहे. यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून या हल्ल्याच बदला घेतला जाईल असे शिंदे म्हणाले आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, “अतिशय दुर्दैवी घटना घडली आहे. या दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करतो आणि धिक्कार करतो. खरंतर पर्यटकांवर झालेला हा पहिलाच मोठा भ्याड हल्ला आहे. पोलि‍सांच्या वेषात येऊन नावं विचारून समोरून गोळ्या घातल्या आहेत. या पाकड्यांचा आणि दहशतवाद्यांचा जेवढा निषेध करता येईल तो थोडाच आहे. काश्मीर हे नंदनवन आहे. येथे पर्यटक पर्यटनसाठी जातात. अशा प्रकारचा भ्याड हल्ला करून दहशतवाद्यांनी जे नीच कृत्य केले आहे त्याचा मी पुन्हा एकदा निषेध करतो.”

“मोदींनी देखील निषेध केला आहे आणि त्यांनी स्वत: देशाचे कणखर गृहमंत्री अमित शाह यांना काश्मीरमध्ये पाठवलं आहे. आता ते काश्मीरमध्ये पोहचतील. मला विश्वास आहे की अॅक्शनला रिअॅक्शन होईल. या भ्याड हल्ल्याचा बदला आपले सैनिक नक्की घेतील. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री याचा बदला घेतल्याशिवाय राहाणार नाहीत आणि याला करारा जवाब दिल्याशिवाय राहाणार नाहीत,” असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

गेल्या अनेक वर्षात हे सगळे पाकडे बिळात लपले होते. मोदींचे सरकार आल्यानंतर यांची असा हल्ला चढवण्याची हिम्मत नव्हती. पण जाणीवपूर्वक हे कृत्य झालं आहे. यामध्ये निरपराध देशातील पर्यटक मारले गेलेत किंवा जखमी झालेत. या भ्याड हल्ल्याचा बदला नक्की घेतल्याशिवाय पंतप्रधान आणि गृहमंत्री राहाणार नाहीत, असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

फडणवीसांनी दिली माहिती

या दहशतवादी हल्ल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. या घटनेत जे लोक मृत्यूमुखी पडले, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या, आप्तस्वकियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. जम्मू-काश्मीर प्रशासनातील वरिष्ठांच्या आम्ही संपर्कात आहोत. पहलगाम ज्यांच्या अखत्यारीत येते, ते काश्मीरचे विभागीय आयुक्त विजयकुमार बिदरी यांनाही फोन करुन माहिती घेतली. आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, महाराष्ट्रातील दोन पर्यटकाचा मृत्यू झाला असून, त्यात दिलीप डिसले, अतुल मोने असे दोघे आहेत. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील 2 जण जखमी झाले आहेत. त्यातील एक माणिक पटेल हे पनवेलचे आहेत. एस. भालचंद्रराव हे दुसरे जखमी आहेत. सुदैवाने दोघांचीही प्रकृती स्थिर आहे,” असे फडणवीस म्हणालेत.

अजित पवारांकडून तीव्र निषेध

काश्मीरमधील पहलगाम भागात पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. या दुर्दैवी घटनेत काही पर्यटकांचा मृत्यू तर, काही जण गंभीर जखमी झाल्याचं वृत्त अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारं आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांप्रती सहसंवेदना व्यक्त करतो. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.