Maharashtra Government Formation : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर महायुतीकडून सरकार स्थापनेच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात झालेली. मात्र, विधानसभेचा निकाल लागल्यानंतर आज तब्बल ८ दिवस झाले तरीही महायुतीचं सरकार स्थापन होऊ शकलं नाही. सरकार स्थापनेसाठी मोठ्या राजकीय घडामोडी सुरु आहेत. यातच मुख्यमंत्रिपदी भाजपाच्या नेत्याची वर्णी लागणार असल्याचं जवळपास निश्चित झाल्याचं सांगितलं जात आहे. पण मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? याबाबत घोषणा झालेली नाही. त्यामुळे याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.
यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडे राज्याचं गृह व महसूलमंत्रिपद मागितल्याची चर्चा आहे. यातच शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरेगावी आहेत. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झोड उठवली. मात्र, यानंतर आज एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत सर्व घडामोडींबाबत भाष्य केलं. तसेच शिवसेनेला गृहखातं पाहिजे का? उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाची चर्चा आहे? तसेच तुम्हाला विधानसभेचं अध्यक्षपद हवं आहे का? अशा अनेक प्रश्नांची उत्तरं एकनाथ शिंदे यांनी देत मोठं भाष्य केलं आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे काय म्हणाले?
काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे हे दरेगावी गेल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. यावर उत्तर देताना काळजीवाहू मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “सरकार स्थापन करताना गावाला यायचं नाही? असा काही नियम आहे का? मी नेहमी गावी येत असतो. निवडणुकीत एवढे दौरे आणि प्रचार झाले. निवडणूक आम्ही महायुती मोठ्या मताधिक्यांनी जिंकलो. मी नेहमी सांगायचो की जनता आम्हाला कामाची पावती देईल. महाविकास आघाडीने अडीच वर्षाच्या कार्यकाळात कामे थांबवली होती. ते आम्ही वेगाने पुढे नेले. तसेच विकास आणि कल्याणकारी योजना आपण पाहिल्या तर लाडकी बहीण योजना असेल, मुलींचं शिक्षण असेल, शेतकऱ्यांच्या योजना असतील, अशा अनेक योजना आम्ही आणल्या. इतिहासात कधीही न झालेल्या योजना आम्ही आणल्या. या योजना महाराष्ट्राच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिल्या जातील. आमचं सरकार हे सर्वसामान्यांचं सरकार होतं. मी देखील एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेलो आहे. त्यामुळे मी गावी येत असतो, मला गावी आल्यानंतर आनंद मिळतो”, असं शिंदे म्हणाले.
तुम्ही मुख्यमंत्री व्हावं अशा चर्चा
तुम्ही मुख्यमंत्री व्हावं? अशी जनतेची मागणी असल्याची चर्चा आहेत?, या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “सहाजिक आहे की जनतेच्या मनात आणि मी कॉमन मॅन म्हणून जे काम केलं. मी म्हणायचो की मुख्यमंत्री नाही तर कॉमन मॅन. मी कॉमन मॅन म्हणून काम केल्यामुळे सहाजिक तशा भावना सर्वसामान्य माणसांच्या आहेत. तसेच मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वात निवडणुका झाल्या. दोन्ही उपमुख्यमंत्री बरोबर होते. तसेच सर्व सहकारी बरोबर होते. त्यामुळे मोठं यश मिळालं. मात्र, यामध्ये कोणताही संभ्रम नको. त्यामुळे मी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेतली आणि मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल हे स्पष्ट केलं”, असंही शिंदे म्हणाले.
शिवसेनेला गृहखातं पाहिजे का?
शिवसेनेला गृहखातं पाहिजे का? असं विचारलं असता यावर शिंदे म्हणाले, “या सर्व गोष्टीबाबत चर्चा होईल. चर्चामधून अनेक गोष्टींवर मार्ग निघेल. तसेच अनेक गोष्टी त्यामधून सुटतील. आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे. त्या लोकांना आम्ही जी आश्वासने दिली आहेत. आमची लोकांशी बांधिलकी आहे. त्यामुळे आम्हाला आणि त्यांना काय मिळणार हे महत्वाचं नसून आम्हाला लोकांसाठी जे काही करता येईल ते आम्ही करत आहोत”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.