Eknath Shinde : उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राज ठाकरे यांना शिवसेनेतून बाहेर पडावं लागलं. त्यांनी शिवसेना सोडावी ही बाळासाहेबांची इच्छा नव्हती, असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तसेच मुख्यमंत्री व्हायचं, हे उद्धव ठाकरेंचं अनेक वर्षांपासूनचं स्वप्न होतं, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्र सोडलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“राज ठाकरेंनी शिवसेना सोडली, त्याला जबाबदार उद्धव ठाकरे होते. १९९५ च्या निवडणुकीत राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या खांद्याला खांदा लाऊन प्रचार केला. त्यावेळी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला होता. पण ज्यावेळी राज ठाकरे यांना पक्षात जबाबदारी देण्याची वेळ आली, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्या मनातली इच्छा बाहेर आली. जशी त्यांची मुख्यमंत्री बनण्याची इच्छ होती, तशीच त्यांची पक्ष ताब्यात घेण्याची इच्छा जागी झाली, त्यामुळेच राज ठाकरे यांना बाजुला करण्यात आलं”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

हेही वाचा – अजित पवार यांचं संजय राऊतांना उत्तर, “आई बापाने जन्म दिलाय म्हणून उचलली जीभ..”…

“उद्धव ठाकरेंच्या मनात असुरक्षिततेची भावना होती”

“पक्षप्रमुख पदासाठी उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्याकडून स्वत:च्या नावाचा प्रस्ताव मांडून घेतला. आणि त्यांना पक्षातून दूर करण्यात आलं. त्यानंतरही राज ठाकरे यांनी जिथे शिवसेना कमकुवत आहे, तिथे काम करण्याची तयारी दाखवली. मात्र, उद्धव ठाकरेंच्या मनात असुरक्षिततेची भावना होती. त्यांनी राज ठाकरे यांना ती जबाबदारीसुद्धा दिली नाही. त्यामुळे राज ठाकरेंना पक्षातून बाहेर पडावं लागलं. त्यांनी शिवसेना सोडावी ही बाळासाहेबांची इच्छा नव्हती”, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

“मुख्यमंत्री व्हायचं उद्धव ठाकरेंचं जुनं स्वप्न”

“मुख्यमंत्री व्हायचं आहे, उद्धव ठाकरेंचं जुनं स्वप्न होतं. याबाबत त्यांनी मला एकदा सांगायला हवं होतं. त्यांच्यासाठी मी सगळा माहौल तयार केला असता. पण आधी त्यांनी म्हटलं की मला मुख्यमंत्री व्हायचं नाही. मग म्हणाले की शरद पवारांनी सांगितलं की तुम्हीच मुख्यमंत्री व्हा. मला एकदा विश्वासात घेऊन सांगितलं असतं तर मी सगळा माहौल तयार केला असता. उद्धव ठाकरेंनी सगळ्या गोष्टी एकदम गुप्तपणे केल्या. मात्र, या गोष्टी लपत नसतात”, अशी टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

हेही वाचा – “उद्धव ठाकरेंनी त्यांना मुख्यमंत्री व्हायचं हे मला सांगितलं असतं तर…”, एकनाथ शिंदेंचं महत्त्वाचं वक्तव्य

अनिल देशमुखांच्या आरोपांवरही केलं भाष्य

यावेळी बोलताना त्यांनी अनिल देशमुखांच्या आरोपांवरही भाष्य केलं. “अनिल देशमुख हे जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा भ्रष्टाचार हा खुलेपणाने चालत होता. त्यावेळी मी उद्धव ठाकरे, अजित पवार यांना कल्पना दिली होती. गृहखातं हे कायदा सुव्यवस्था सांभाळणारं खातं आहे. मी म्हटलं होतं की भ्रष्टाचार खुलेपणाने चालला आहे, त्यात तुम्ही लक्ष घाला. पण त्यावेळी भ्रष्टाचार बोकाळला होता. त्याची किंमत अनिल देशमुखांना मोजावी लागली. अनिल देशमुखांना उद्धव ठाकरेंनी सांगायला पाहिजे होतं”, असे ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde on raj thackeray shinde left balasaheb critcized uddhav thackeray spb