Maharashtra Government Formation : विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं. विधानसभेत मिळालेल्या मोठ्या यशानंतर महायुतीकडून राज्यात सरकार स्थापनेच्या दिशेने पावलं टाकण्यात येत आहेत. पण निकालानंतर आठ दिवस झाले तरीही महायुतीचं सरकार स्थापन होऊ शकलं नाही. सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचाली सुरु आहेत. यातच मुख्यमंत्री पदाची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार? हे देखील स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत सस्पेंस कायम असल्याचं बोललं जात आहे.
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडे राज्याचं गृहखातं मागितल्याची चर्चा आहे. यातच शिंदे साताऱ्यातील त्यांच्या दरेगावी आहेत. त्यामुळे ते नाराज असल्याचंही बोललं जात आहे. यातच उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाचीही चर्चा असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, या सर्व घडामोडींबाबत आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरेगावातून प्रतिक्रिया देत भाष्य केलं आहे. माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदेंच्या नावाचीही चर्चा आहे? यावर प्रश्न विचारला असता अजून चर्चा सुरु आहेत, असं म्हणत त्यांनी सूचक भाष्य केलं.
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
उपमुख्यमंत्रिपदासाठी श्रीकांत शिंदेंचं नावाची चर्चा आहे? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारला असता ते म्हणाले, “अजून चर्चा सुरु आहेत. तुम्हीच (माध्यमात) चर्चा करत असतात. तुमच्या (माध्यमाच्या) चर्चा जास्त असतात. त्यामुळे तुम्हाला एकच सांगतो की या सर्व चर्चा आहेत. आमची अमित शाह यांच्याबरोबर चर्चा झाली. यानंतर आता आमच्या तिघांमध्ये (एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार) एक बैठक होईल. या बैठकीत आमची साधक बाधक चर्चा होईल”, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं.
शिवसेनेने गृहखात्याची मागणी केलीय का?
शिवसेनेला गृहखातं पाहिजे का? असं विचारलं असता यावर शिंदे म्हणाले, “या सर्व गोष्टीबाबत चर्चा होईल. चर्चामधून अनेक गोष्टींवर मार्ग निघेल. तसेच अनेक गोष्टी त्यामधून सुटतील. आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे. त्या लोकांना आम्ही जी आश्वासने दिली आहेत. आमची लोकांशी बांधिलकी आहे. त्यामुळे आम्हाला आणि त्यांना काय मिळणार हे महत्वाचं नसून आम्हाला लोकांसाठी जे काही करता येईल ते आम्ही करत आहोत”, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
तुम्ही मुख्यमंत्री व्हावं अशी जनतेची मागणी असल्याची चर्चा
तुम्ही मुख्यमंत्री व्हावं? अशी जनतेची मागणी असल्याची चर्चा आहेत?, या प्रश्नावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “सहाजिक आहे की जनतेच्या मनात आणि मी कॉमन मॅन म्हणून जे काम केलं. मी म्हणायचो की मुख्यमंत्री नाही तर कॉमन मॅन. मी कॉमन मॅन म्हणून काम केल्यामुळे सहाजिक तशा भावना सर्वसामान्य माणसांच्या आहेत. तसेच मुख्यमंत्री म्हणून माझ्या नेतृत्वात निवडणुका झाल्या. दोन्ही उपमुख्यमंत्री बरोबर होते. तसेच सर्व सहकारी बरोबर होते. त्यामुळे मोठं यश मिळालं. मात्र, यामध्ये कोणताही संभ्रम नको. त्यामुळे मी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेतली आणि मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल हे स्पष्ट केलं”, असंही शिंदे म्हणाले