हिंगोली : राज्याचा सर्वागीण विकास करण्यासाठी, कार्यकर्त्यांची होणारी कुचंबणा टाळण्यासाठी मी हा निर्णय घेतला. उंटावरून शेळय़ा हाकणारा मी मुख्यमंत्री नाही. हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. राज्यात इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, हा आपला शब्द असल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करणाऱ्या राजकीय मंडळींपासून सावध राहण्याचे आवाहन केले.
आखाडा बाळापूर येथे शिवसंकल्प अभियान व कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री अब्दुल सत्तार, खासदार हेमंत पाटील, आमदार संतोष बांगर, आमदार बालाजी कल्याणकर आदी उपस्थित होते.
हेही वाचा >>>हिटलरशाहीत घाणेरडे खोक्याचे राजकारण विधिसंमत झाल्याची आदित्य ठाकरे यांची जहरी टीका
आपण एकदा शब्द दिल्यानंतर तो पाळत असतो. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला जाईल, इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिले. राज्यात शिवसेना वाचविण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांचे खच्चीकरण थांबविण्यासाठी वेगळे पाऊल उचलले. आमच्यासोबत आमदार, खासदार हेदेखील आले. स्वार्थासाठी वेगळी भूमिका घेतली असती तर तुम्ही सर्व या ठिकाणी जमला असता काय, असा सवाल त्यांनी केला. खरी शिवसेना तुमची, आमची असल्याचे स्पष्ट करून त्यांनी राज्याचा सर्वागीण विकास हीच आमची भूमिका असल्याचे सांगितले.
माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणून घरात बसणारा, उंटावरून शेळय़ा हाकणारा मी मुख्यमंत्री नाही. सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाल्यावर तुमचा पोटशुळ का उठतो आहे, असा हल्लाही त्यांनी केला. हेलिकॉप्टरमधून फोटोग्राफी करण्यापेक्षा हेलिकॉप्टरमधून शेतात जाणे केव्हाही चांगले, असा टोलाही त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावला. मी जमिनीवरील कार्यकर्ता असून सदैव कार्यकर्ता म्हणूनच काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा >>>पक्ष प्रमुखपद नाकारलं, घटनादुरुस्ती अवैध, आमदार मात्र पात्र; नार्वेकरांच्या निकालानंतर ठाकरे गटाचे वकील म्हणाले…
अयोध्येत राम मंदिर व जम्मू-काश्मिरमधील ३७० कलम हटविणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. त्यांचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केले आहे. मंदिर वही बनायेंगे, तारीख नही बतायेंगे असे म्हणणाऱ्यांना पंतप्रधान मोदी यांनी मंदिर बांधून दाखवले आणि तारीखही जाहीर केली. राम मंदिराचे निमंत्रण मिळाल्यानंतरही त्या ठिकाणी जाणार नसल्याचे सांगणाऱ्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत ‘उबाठा’ जातोच कसा, असा सवाल त्यांनी केला.
देशातील चार राज्यांच्या निवडणुकीत मोदी यांची गॅरंटी चालली आहे. महाराष्ट्रातही अब की बार ४५ पार, असा आपला संकल्प असल्याचे सांगताना आगामी काळात प्रत्येक ठिकाणी महायुतीचे मेळावे होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.