‘राष्ट्रात मोदी आणि राज्यात शिंदे’ या जाहिरातीवरून महायुती सरकारमध्ये वादळ निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या जाहिरातीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचा संदेश देण्यात आला होता. त्यामुळे या जाहिरातीनंतर भाजपाने शिंदे गटातील नेत्यांना जाहीर इशाराही दिला होता. या जाहिरातीमुळे वादंग निर्माण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ‘गर्जा महाराष्ट्र माझा’च्या जाहिरातीने या प्रकरणाचा उत्तरार्ध करण्यात आला.
या जाहिरात प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांची भूमिका जाहीर केली नव्हती. परंतु गुरुवारी (१५ जून) पालघरमध्ये झालेल्या ‘शासन तुमच्या दारी’ या कार्यक्रमात त्यांनी जाहिररीत्या यावर भाष्य केलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत असलेल्या मैत्रीचाही उल्लेख केला.
पहिल्या जाहिरातीनंतर महायुतीत तणाव निर्माण झाला. त्यामुळे दुसरी जाहिरात छापण्यात आली, तसेच पालघरमधील शिंदे आणि फडणवीसांच्या भाषणानंतरही एक महत्त्वाचा प्रश्न अनुत्तरित आहे. तो म्हणजे ती जाहिरात नेमकी कोणी दिली होती. कारण शिंदे गटातील मंत्री शंभूराज देसाई याबाबत म्हणाले की, ही जाहिरात शिंदे गटाने दिली नव्हती. कुठल्या तरी हितचिंतकाने दिली होती. यावर आज (शुक्रवार, १६ जून) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधिंनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारला. तसेच या जाहिरातीमुळे भाजपा आणि शिंदे गटात किंवा तुमच्यात आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काही तणाव निर्माण झाला आहे का असा प्रश्नही विचारला. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, मी कालच तुम्हाला सांगितलं आहे, ‘ये फेविकॉल का जोड है, टुटेगा नही.’
एकनाथ शिंदे म्हणाले, काल पालघरमध्ये झालेला शासन आपल्या दारी हा कार्यक्रम तुम्ही पाहिला आहे. तुम्ही माथ्यमांचे प्रतिनिधी त्याचे साक्षीदार आहात. मुळात एका अतिउत्साही कार्यकर्त्याच्या जाहिरातीमुळे ही युती तुटायची नाही. ही युती इतकी कमजोर नाही. वैचारिक भावनेतून आणि एका विशिष्ट भूमिकेतून आम्ही ही युती केली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते तेव्हापासूनचही ही युती आहे. उलट मधल्या एक वर्षभरात यात जो काही मिठाचा खडा कोणीतरी टाकला होता तो आम्ही काढून फेकून दिला आहे.