Eknath Shinde vs Uddhav Thackeray : शिवसेना पक्षातील फुटीला आता दोन वर्षे होऊन गेली आहेत. जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. त्याचबरोबर शिवसेना पक्षाचे दोन गट पडले. त्यापैकी एका (मोठ्या) गटाचं नेतृत्व एकनाथ शिंदे करत आहेत. तर दुसरा गट उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहे. एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांबरोबर बनवलेल्या गटासह भाजपाबरोबर हातमिळवणी केली असून त्यांनी भाजपाबरोबर राज्यात सरकार स्थापन केलं आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि भाजपा युतीचं राज्यात दोन वर्षांपासून सरकार बनलं असून एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या दोन वर्षांच्या काळात एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला व काँग्रेसला अनेकदा धक्के दिले आहेत. या दोन पक्षांमधील अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
दरम्यान, शुक्रवारी (२६ जुलै) रोजी एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाला आणखी एक धक्का दिला. ठाकरे गटातील मुंबई व ठाण्यातील अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि नेत्यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. विशेष म्हणजे शनिवारी (२७ जुलै) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या आदल्या दिवशीच एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना हा धक्का दिला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा संपन्न
एकनाथ शिंदे यांनी या पक्षप्रवेश सोहळ्याची माहिती एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवरून दिली आहे. त्यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे, ठाणे शहरातील उबाठा गटाचे शिवसेना व युवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यात उबाठा गटाचे ठाणे उपजिल्हाप्रमुख अर्जुन डाभी, ठाणे शहराध्यक्ष किरण जाधव, शिवसेना शाखाप्रमुख अभिषेक शिंदे, विभाग अधिकारी राज वर्मा, शाखाधिकारी मनोज जाधव, युवासैनिक आदर्श यादव, युवासेना शाखा अधिकारी वेदांत सावंत यांचा प्रवेश संपन्न झाला. यावेळी आमदार भरत गोगावले, आमदार भावना गवळी, शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे, ठाणे जिल्हा युवासेना राज्य समन्वयक नितीन लांडगे, टेंभीनाका शिवसेना शाखेचे शाखाप्रमुख निखिल बुडजडे, उपविभागप्रमुख स्वानंद पवार उपस्थित होते.
हे ही वाचा >> “सर्वोच्च न्ययालयाने तडीपार केलेला माणूस…”, शरद पवारांचा अमित शाहांवर पलटवार
एकनाथ शिंदे म्हणाले, महायुती सरकारने गेल्या तीन वर्षात केलेल्या कामांमुळे प्रभावित होऊन अनेकजण शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. उबाठा गटाचे अनेक पदाधिकारी आणि मुंबईतील ५० नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेना अधिक भक्कम होईल