“काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके!’ या शब्दांमुळे प्रकाशझोतात आलेले सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील यांनी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अगदी गावरान शैलीमध्ये टीका केलीय. गुवाहाटीमधील हॉटेल ‘रेडिसन्स ब्लू’मध्ये बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बंड केलेले आमदार वास्तव्यास असून याच ठिकाणी सर्व सहकाऱ्यांसमोर बोलताना शाहाजीबापू पाटील यांनी, काहीही करा फक्त शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेऊ नका अशी विनंती केलीय. यावेळी शहाजीबापू पाटील यांनी आपल्या खास शैलीमध्ये केलेल्या भाषणादरम्यान सर्व उपस्थित आमदार खदखदून हसताना दिसत होते.
नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीमध्ये असणारा ‘झाडी, डोंगार, हाटील’ फेम आमदार म्हणतो, “फडणवीसांच्या नावाने…”
“वसंतदादा पाटील हे माझे वडील आहे. त्यांच्या आशिर्वादाने मी आज मोठा झालेलो आहे. मी वसंतदादा पाटलांना कधीही दगा देणार नाही, असं शरद पवार म्हणाले अन् दीड वाजता तिथचं बातमी आली शरद पवारांनी बंड केलंय. ४० आमदार घेऊन काँग्रेसमधून पळून गेले. वसंतदादांचा राजीनामा,” असं म्हणत शहाजीबापूंनी भाषणाला सुरुवात करताच सर्व आमदार जोरजोरात हसू लागले.
नक्की वाचा >> “…म्हणून मी तेव्हा काय झाडी, काय डोंगार, काय हाटील असं म्हटलं”; शहाजीबापूंचा ‘तो’ किस्सा ऐकून एकच हस्यकल्लोळ
पुढे शरद पवारांना टीका करताना, “ज्या ज्या माणसाला शरद पवारांनी जवळ घेतलं त्या माणसाला दाबून दाबून मारुन टाकलं, असा माझा अभ्यास आहे,” असंही शहाजीबापूंनी म्हटलंय. “आपण लांब आहे चांगलं आहे. त्यांच्या बाजूला जाऊ नका. बाकी काहीही निर्णय घ्या फक्त त्यांना जवळ करु नका. नाहीतर मेलो आपण,” असं शहाजीबापू म्हणताच पुन्हा सर्वजण जोरजोरात हसू लागले. अगदी सर्वांसमोर प्रमुख नेते म्हणून बसलेल्या एकनाथ शिंदेंनाही हसू अनावर झाल्याचं पहायला मिळालं.
नक्की वाचा >> ‘काय झाडी… काय डोंगार… काय हाटील…’ने सोडवली पुणेकरांची मोठी समस्या; ही शक्कल पाहून तुम्हीही म्हणाल, ‘काय आयडीया…’
सभेत त्यांनी आश्वासन दिलेलं २ टीएमसी पाणी सांगोला तालुक्याला १९९७-९८ मध्ये देतो. अजून पाणी आलेलं नाही. एका जलसिंचन उपसा योजनेला हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यासाठी मी स्वत: उद्धव ठाकरेंच्या हातात पत्र दिलं होतं. पावणे तीन वर्षे झाली असून काही झालेलं नाही, अशी खंतही शहाजीबापू यांनी व्यक्त केली.
“वसंतदादा, शंकरराव, नाईकांनी मुख्यमंत्री पद हाताळलं आहे. मोठ्या मोठ्या व्यक्तींनी या राज्याचं नेतृत्व केलंय. म्हणून हे राज्य प्रगतीपथावर गेलेलं आहे. राज्याची प्रगती थांबता कामा नये. ती प्रगती फक्त तुम्ही आणि तुम्हीच करु शकता, हा आम्हाला ठाम विश्वास आहे,” असंही शहाजीबापू यावेळी बोलताना समोर बसलेल्या एकनाथ शिंदेंकडे हात करुन म्हणाले.