Eknath Shinde Meets Raj Thackeray: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदेंच्या नाराजीचे तर्क लावले जात आहेत. सत्ताधारी गटात एकनाथ शिंदेंची शिवसेना नाराज असल्याचं बोललं जात आहे. यावरून अनेक अंदाज बांधले जात असतानाच एकनाथ शिंदे मंगळवारी संध्याकाळी उशीरा थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरी दाखल झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. या दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाल्यानंतर दोन्ही बाजूच्या नेतेमंडळींनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

आधी लोकसभा आणि नंतर विधानसभा निवडणुकांवेळी मनसेचा महायुतीमध्ये प्रवेश होण्याची जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळालं. मात्र, या दोन्ही निवडणुकांमध्ये मनसे महायुतीमध्ये सहभागी झाली नाही. आता सर्वच राजकीय पक्षांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केलं आहे. मुंबई महानगर पालिकेची निवडणूक सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाजूंनी प्रतिष्ठेची केली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुणाच्या पाठीशी उभी राहणार? की स्वतंत्रच लढणार? यावर समीकरणं बदलण्याची शक्यता आहे.

एकनाथ शिंदे-राज ठाकरेंची भेट

मंगळवारी रात्री उशीरा राज ठाकरे व एकनाथ शिंदे यांची भेट झाली. एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी दोघांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. यानंतर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं विधान केलं. “आता पुन्हा निवडणुकांना खूप वेळ आहे. त्यामुळे निवडणुकांवर चर्चा करण्याची आत्ता वेळ नाही. निवडणुकांचा माहौल तयार होतो तेव्हा युती वगैरेच्या चर्चा सुरू होतात. त्यामुळे ही फक्त सदिच्छा भेट होती”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

पण यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह उदय सामंत व संदीप देशपांडे यांनी केलेल्या विधानांमुळे तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. आमच्यात वैचारिक भेद नसल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी बैठकीआधी राज ठाकरे शिंदेंसोबत आले तर आनंद होईल असं विधान केलं.

“यात कुणावरही दबाव टाकण्याचा प्रयत्न नाही”

“राज ठाकरेंसारखी व्यक्ती एकनाथ शिंदेंसोबत येत असेल, तर आनंदच होईल. पण यासंदर्भात महायुतीचे सर्व अधिकार भाजपाकडून देवेंद्र फडणवीस, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि मनसेकडून राज ठाकरे ठरवतील. एकनाथ शिंदेंनी कधीही दबाव आणण्याचं राजकारण केलेलं नाही. राज ठाकरेंनीही ते कधी केलं नाही. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीसही इथे आले होते. या स्नेहभोजनातून महायुतीवर किंवा कुठल्या पक्षावर दबाव टाकण्याचा कोणताही प्रयत्न नाही”, असं उदय सामंत म्हणाले.

संदीप देशपांडे म्हणतात, विचारांची तफावत नाही!

दरम्यान, मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदीप देशपांडे यांना सेना-मनसे युती होणार का? याबाबत विचारणा केली असता त्यांनी थेट नकार न देता सूचक विधान केलं. “आमच्यात विचारांची तफावत नाहीये. शेवटी राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचेच विचार पुढे नेत आहेत. एकनाथ शिंदेही तेच करत आहेत. त्यामुळे आमच्यात वैचारिक तफावत नाहीये”, असं ते म्हणाले.

“प्रत्येकवेळी दोन नेते भेटले की राजकीय चर्चा होतेच असं नाही. आज राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना स्नेहभोजनाचं आमंत्रण दिलं होतं. आज जुन्या आठवणींना दोघांनी उजाळा दिला. याव्यतिरिक्त काहीही झालेलं नाही. फक्त स्नेहभोजनाचा कार्यक्रम होता”, असंही संदीप देशपांडेंनी सांगितलं.