Eknath Shinde : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे हे सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करत आहेत. अशातच ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठा आरक्षण देऊ इच्छित आहेत. मात्र, त्यांना देवेंद्र फडणवीस थांबवत आहेत’, असा आरोपही मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या आरोपावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाष्य केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रक्षाबंधनाच्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मनोज जरांगे यांच्या देवेंद्र फडणवीसांवरील आरोपांबाबत विचारण्यात आले. यासंदर्भात बोलताना, हे आरोप चुकीचे असून सरकारने मराठा समाजाला जे आरक्षण दिलं आहे, त्यात देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची भूमिका होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

हेही वाचा – Eknath Shinde : “राज ठाकरेंना पक्षात जबाबदारी देण्याची वेळ आली तेव्हा…”; उद्धव ठाकरेंबद्दल नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

मराठा समाजाला आरक्षण देताना मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आम्ही एकत्र बैठक घेतली होती. त्यासाठी आम्ही विशेष अधिवेशन बोलवलं होतं. यासंदर्भातील प्रत्येक बैठकीला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने जो कायदा पारीत केला, त्यातही देवेंद्र फडणवीसांची मोठी भूमिका होती. याशिवाय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असतानाही मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे मराठा आरक्षणाच्या विरोधात आहे, असं म्हणणं, चुकीचं आहे. यात काहीही तथ्य नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच आम्ही सरकार म्हणून जो निर्णय घेतला जातो, तो सर्वांच्या संमतीने घेतला जाते, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Devendra Fadnavis : “…तर मी राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन”, देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

मनोज जरांगेंच्या आरोपाला देवेंद्र फडणवीसांचंही प्रत्युत्तर

दरम्यान, मनोज जरांगे यांच्या या आरोपाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रत्युत्तर दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जर म्हटलं की, मराठा आरक्षणाबाबतचा कोणताही निर्णय घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मी तो प्रयत्न मी थांबवला तर त्याच क्षणी मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातूनही निवृत्त होईन”, असं देवेंद्र फडणवीस आज माध्यमांशी बोलताना म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde reaction on manoj jarange devendra fadnavis allegation maratha reservation spb