आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार नसल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली आहे. त्यात सत्ताधाऱ्यांकडूनही वारंवार या मुद्द्यावरून टीका-टिप्पणी केली जात आहे. त्यासंदर्भात आज (२४ एप्रिल) माध्यमांच्या प्रतिनिधिंनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवारांना सवाल केला. यावर शरद पवार म्हणाले की, “आम्ही एकत्र लढणार वैगरेबद्दल बोलायचं झालं, तर आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करण्याची आमची इच्छा आहे. पण फक्त इच्छाच नेहमी पुरेशी नसते. जागांचं वाटप आणि त्यात काही अडचणी आहेत की नाहीत यावर अजून चर्चा केलेलीच नाही. त्यामुळे यावर कसं सांगता येईल?”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. तर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी मात्र म्हटलं आहे की, शरद पवारांच्या वक्तव्यांचा नेहमी वेगळा अर्थ काढला जातो. महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. महाविकास आघाडीच्या एकत्र सभा आम्ही कशासाठी घेतोय? तर आम्ही एकत्र आहोत हे सांगण्यासाठीच. येत्या १ मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची ऐतिहासिक सभा होत आहे. त्या सभेला तिन्ही पक्ष एकत्र येऊन तिन्ही पक्षाचे वरीष्ठ नेते उपस्थित राहतील. पुणे, कोल्हापूर अशाही सभा होणार आहेत.

दरम्यान, शरद पवारांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिंदे म्हणाले की, पवार साहेब हे अनुभवी नेते आहेत. त्यांच्या वक्तव्याला महत्त्व असतं, गांभीर्य असतं, एवढंच मी म्हणेन.

हे ही वाचा >> “आता स्फोट होऊ शकतो”, उद्धव ठाकरेंच्या नरेंद्र मोदींवरील ‘त्या’ टीकेनंतर भाजपा संतप्त, बावनकुळे म्हणाले, “असंतोष भडकणार”

शरद पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे प्रदेशाद्यक्ष नाना पटोले म्हणाले की, या परिस्थितीत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. जे आमच्याबरोबर राहतील त्यांना घेऊन लोकशाही वाचवण्याची लढाई आम्ही लढत राहू.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde reaction on sharad pawar statement regarding maha vikas aghadi asc
Show comments