Eknath Shinde Dasara Melava 2024 remark on Mahavikas Aghadi :. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने यंदा दक्षिण मुंबईतील आझाद मैदानावर दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या मेळाव्यातून मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री म्हणाले, “माझी दाढी या लोकांना खुपते. सारखं माझ्या दाढीवरून बोलतात. परंतु, एक गोष्ट मी सगळ्यांना सांगू इच्छितो, होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी, महाविरोधी आघाडी, महाराष्ट्राच्या विकासाची जोरदार धावू लागली गाडी, ही माझ्या दाढीची करामत आहे, म्हणून सांगतो मला हलक्यात घेऊ नका”.

मुख्यमंत्री म्हणाले, “आपल्या कार्यकाळात आपण मुंबई व महाराष्ट्रातील अनेक रखडलेले प्रकरण प्रकल्प पूर्ण केले. या लोकांनी (महाविकास आघाडी) मुंबईच्या विकासात पैसे खाल्ले. मात्र, आपण आता मुंबईचा विकास करणार आहोत. आता मुंबईच्या रस्त्यांवर खड्डे दिसणार नाहीत. कारण हा एकनाथ शिंदे मुंबईचे रस्ते खड्डेमुक्त केल्याशिवाय राहणार नाही. जिथे टेंडर तिकडे सरेंडर अशी महाविकास आघाडीची भूमिका होती. कंत्राटदाराला सूट देताना महाराष्ट्राची लूट कशी करायची हे त्यांना माहीत होतं. हे सगळं करत असताना त्यांना जनाची नाही तर मनाची सुद्धा लाज वाटली नाही.

मुख्यमंत्र्यांची उद्धव ठाकरेंवर टीका

एकनाथ शिंदे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांच्याकडे २५ वर्षे मुंबईचे सत्ता होती. परंतु, त्यांनी मुंबईत काहीच काम केलं नाही. धारावी प्रकल्पात काड्या घालण्याचं काम केलं. धारावीच्या विकासप्रकल्पासाठी नेमलेला पहिला कंत्राटदार या लोकांनी रद्द केला. यांनी (उद्धव ठाकरे) स्वतः मात्र बंगल्यावर बंगले बांधले. परंतु, धारावीकरांना त्याच चिखलत ठेवलं. त्यानंतर ठराविक लोकांनाच घर देण्याचा देण्याची योजना त्या लोकांनी आखली. मात्र, हा एकनाथ शिंदे म्हणाला, सगळ्यांना घरं द्या. एका घराची किंमत एक कोटी रुपये इतकी आहे. धारावीत दोन लाख घरं आहेत. दोन लाख कुटुंबांना दोन लाख घरं दिली जातील. याचाच अर्थ दोन लाख घरांसाठी दोन लाख कोटी रुपये मोजले जाणार आहेत. आम्ही गिरणी कामगारांना देखील घरं देणार आहोत. आम्ही मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार आहोत”.