राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी ‘लाडकी बहीण’ या योजनेची घोषणा केली होती. या योजनेनुसार राज्यातील महिलांना प्रतिमहा १५०० रुपये देणार असल्याचे जाहीर करण्यात आलं होते. मात्र, या योजनेवर आता विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन सरकारने ही घोषणा केल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, या आरोपाला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे. ते आज विधानसभेत बोलत होते.

हेही वाचा – Maharashtra Assembly Budget 2024-2025: अजित पवारांनी केली ‘लाडकी बहीण’ योजनेची घोषणा, कोण ठरणार पात्र? किती मिळणार निधी?

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?

“लाडकी बहीण योजना म्हणजे माहेरचा आहेर आहे. आम्ही तो नियमित देत राहणार आहोत. अनेकांना वाटतं की या योजनेचा लाभ घेण्यासाठी १५ दिवसांत अर्ज करावा लागेल. पण तसं नाही. आपल्याकडे ज्यांची माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील. जर कुणाचा अर्ज ऑगस्टमध्ये आला, तर त्यांना जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे पैसे दिले जातील”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

पुढे बोलताना “या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला एक रुपयाही द्यायची गरज असून जर कुणी पैसे मागितले तर त्याची तक्रार करा, सरकार त्याला तुरुंगात टाकेल”, असेही ते म्हणाले. तसेच “ज्यावेळी आम्ही ही योजना जाहीर केली, तेव्हा विरोधकांनी आमच्यावर टीका केली. मात्र, बाहेर महिलांनी मला भेटून राखी बांधली”, असंही त्यांनी सांगितले.

“विरोधकांना जबाबदारीचं भान नाही”

पुढे बोलताना त्यांनी अंबादास दानवे यांनी केलेल्या शिवीगाळ प्रकरणावरूनही विरोधकांवर टीका केली. “विरोधकांना आपल्या जबाबदारीचं भान आहे की नाही मला माहिती नाही. पण सभागृहाबाहेर असा एकही दिवस नाही, जेव्हा विरोधकांनी आम्हाला शिव्या दिल्या नाहीत. असा एकही दिवस नाही, जेव्हा विरोधकांनी पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं नाही. इतकंच नाही, आता सभागृहातदेखील आम्हाल शिव्या दिल्या जात आहेत. काल विधान परिषदेत जे काही घडलं, ते दुर्दैवी आहे. असं यापूर्वी कधीही झालं नव्हतं. आम्ही केलेल्या कामामुळे तुमचा संयम सुटत असेल तर संयम राखा विरोधकांना यापुढेही विरोधातच राहायचं आहे”, असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा – अंबादास दानवेंच्या निलंबनाच्या कारवाईवर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “षडयंत्र रचून…”

“आमची कामगिरी बघून विरोधकांचे चेहरे पडले”

“राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. ज्यावेळी आम्ही हे सरकार स्थापन केलं, तेव्हा अनेकांनी हे सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी केली होती. काही लोकांनीतर देव पाण्यात ठेवले होते. मात्र, आमचं सरकारतर पडलं नाही. पण महायुती सरकारची कामगिरी बघून विरोधकांचे चेहरे पडले आहेत, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. २०१९ मध्ये जनमत पायदळी तुडवून महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं होतं. मात्र, आम्ही जनमताचा आदर करत महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन केलं”. असेही ते म्हणाले.