महाराष्ट्र विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून (गुरुवार) सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारवर टीका केली. या पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले, महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी मेटाकुटीला आला आहे. याकडे सरकारचं दुर्लक्ष होत असून त्यावर चर्चा करायला तयार नाही. त्यामुळे सरकारच्या चहापानाला जाणं आम्हाला योग्य वाटत नाही, म्हणून आम्ही या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे.
विरोधकांच्या पत्रकार परिषदेनंतर राज्य सरकारनेही पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या पत्रकार परिषदेला सामोरे गेले. पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस म्हणाले, “विरोधी पक्षाने चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. हा कार्यक्रम चर्चेसाठी असतो. पण कदाचित विरोधी पक्षाचा स्वभाव पाहाता पुढच्या वेळी त्यांच्यासाठी सुपारीपान ठेवावं लागेल. म्हणजे कदाचित ते येतील अशी शक्यता मला दिसतेय.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील विरोधकांवर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून सातत्याने त्यांच्या दिल्लीवाऱ्या होत आहेत. तसेच अजित पवार यांच्याही दिल्लीवाऱ्या झाल्या आहेत. यावरून विरोधक शिंदे आणि पवार या दोन्ही नेत्यांवर टीका करत असतात. मुख्यमंत्री हे दिल्लीची (भाजपा) कठपुतली असल्याची टीका केली जाते. या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांनी उत्तर दिलं. एकनाथ शिंदे म्हणाले, आमचा स्वाभिमान हरवला आहे अशी टीका केली जाते. दिल्लीत जातात, दिल्लीची कठपुतली आहेत, असं बोललं जातं. परंतु, ज्यांना मॅडमच्या परवानगीशिवाय इथे स्वतःचं नाक खाजवायचीसुद्धा परवानगी नाही त्यांनी आमच्यावर आरोप करू नये. त्यांनी स्वाभिमानाची भाषा करू नये.
हे ही वाचा >> “विरोधकांचा स्वभाव पाहाता पुढच्या वेळी सुपारीपान…”, देवेंद्र फडणवीसांचा टोला; म्हणाले, “लोकसभेत याहून वाईट…!”
एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही दिल्लीला जातो आणि निधी आणतो. केंद्र सरकारने आम्हाला जे पैसे दिले ते मागितल्याशिवाय मिळाले नाहीत. त्यासाठी प्रयत्न करावे लागतात, पाठपुरावा करावा लागतो. कडक सिंह बनून चालत नाही. तुमच्या अहंकारामुळे तुम्हाला केंद्राने पैसे दिले नाहीत. तुम्ही मागितलेसुद्धा नाही. तुमच्या अंहकारामुळे राज्याचं नुकसान झालं. तुम्ही राज्यातले अनेक विकासप्रकल्प बंद पाडले, स्थगित केले. त्यानंतर आमचं सरकार आल्यावर आम्ही ते सुरू केले. तुम्ही राज्याला मागे नेण्याचं काम केलं. आम्ही आता राज्याला पुढे नेत आहोत.