शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आज ( ८ फेब्रुवारी ) पत्रकार परिषद घेत सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगावरील सुनावणीवर भाष्य केलं. जून महिन्यात १६ आमदारांच्या अपात्रेचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला. त्यानंतर जुलै महिन्यात गद्दार गट निवडणूक आयोगाकडे जात शिवसेनेवर दावा करतो. त्यामुळे आमदार अपात्र ठरत असतील, तर निवडणूक आयोग त्यांचा दावा कसं काय गृहित धरू शकतो. म्हणून जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत आयोगाने निकाल देऊ नये, असं मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व्यक्त केलं होतं.
उद्धव ठाकरेंच्या विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाष्य करत प्रत्युत्तर दिलं आहे. “भावनेवर आणि कोणाच्याही म्हणण्यानुसार निर्णय होत नाही. लोकशाहीत बहुमताला महत्व आहे. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचं महत्व खूप जास्त आहे. सत्ता स्थापन कोणामुळे होती? तर निवडून आलेल्या आमदार आणि खासदारांमुळे,” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा : “उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार होते, पण…”, दीपक केसरकरांचा मोठा गौप्यस्फोट
“राज्यात घटनात्मक सरकार स्थापन झालं आहे. राज्यात आणि देशात घटना, कायदा आणि नियम आहे. कोणाला काय वाटतं, यापेक्षा कायद्याने काय बरोबर याचा विचार लोकशाहीत होत असतो. सर्वोच्च न्यायालय हे सर्वोच्च आहे. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे. काही लोकं न्यायव्यवस्थेलाच मार्गदर्शन करत आहेत. सर्वोच्च न्यायालयाला सल्ले देत आहेत,” असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
हेही वाचा : “२०१३ अन् २०१८ साली शिवसेनेत लोकशाही पद्धतीने…”, शिंदे गटाचं उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर
“शिंदे गटाचे आमदार अपात्र होणारच आहेत”
यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाचे आमदार अपात्र होणारच असल्याचा ठाम दावा केला. “घटनेला काहीतरी अर्थ असतो. उगीच तो कागदपत्रांचा खेळ नसतो. त्यामुळे घटनेनुसार आयोगाने काही कायदे केले आहेत. त्यांचं पूर्ण पालन आम्ही करतो. त्याचवेळी कार्याध्यक्ष वगैरे पदं आम्ही घटनेनुसार निर्माण केली. आयोगाच्या मान्यतेनुसारच आम्ही कारभार करतो. आता त्यांची अडचण ही झालीये की त्यांनी व्हीप मोडला आहे. त्यामुळे ते अपात्र तर होणारच. अपात्र झाल्यानंतर पुन्हा दावा कसा सांगणार? त्यामुळे यात वेळ लागावा, विलंब व्हावा म्हणून ही खुसपटं काढायची आणि नको तो युक्तीवाद तिथे करायचा याला काही अर्थ नाही”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटावर हल्लाबोल केला.