Eknath Shinde on Manoj Jarange Patil & Maratha Reservation : महायुतीमधील प्रमुख नेत्यांनी आज (१६ ऑक्टोबर) संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारच्या मागील अडीच वर्षांच्या कारभाराचा लेखाजोखा मांडला. यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी एकनाथ शिंदे यांना मराठा आरक्षणाचा तिढा आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविषयी प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले, आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार. या पत्रकार परिषदेत शिंदे यांना विचारण्यात आलं की महायुतीसमोर सध्या मनोज जरांगे यांचं मोठं आव्हान उभं आहे. आचारसंहिता लागू होईपर्यंत मराठा आरक्षणाचा निकाल लागला नाही तर आम्ही वेगळा निर्णय घेऊ अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली होती. त्यामुळे निवडणुकीत महायुतीला मनोज जरांगे यांच्यामुळे मोठा फटका बसू शकतो का? यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आम्ही बोलतो ते करतो. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार आहोत. ओबीसी समाजाला किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार”.

एकनाथ शिंदे म्हणाले, “मी भर दसरा मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाची शपथ घेतली, त्यानंतर ताबडतोब विधानसभेचं अधिवेशन बोलावलं आणि मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं. परंतु, ते आरक्षण रद्द करण्यासाठी न्यायालयात कोण गेलं हे सर्वांना माहिती आहे. त्या आरक्षणाविरोधातील याचिकाकर्ते कोण आहेत ते सर्वांना माहिती आहे. तरीदेखील आम्ही ते आरक्षण टिकवलं. यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने देखील मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. मात्र, महाविकास आघाडीने ते आरक्षण घालवलं. सर्वोच्च न्यायालयात त्या आरक्षणासाठी भक्कम बाजू मांडायला हवी होती, त्यासाठी पुरावे मांडायला हवे होते. मात्र, ते सरकार अपयशी ठरलं”.

हे ही वाचा >> “वंदे मातरमला विरोध करणाऱ्या व्यक्तीला आमदार केलं,आता हिंदुत्त्वाचा गब्बर…”; इद्रीस नायकवाडींच्या शपथविधीवरून संजय राऊतांचं टीकास्र!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगे पाटलांना सल्ला

मुख्यमंत्री म्हणाले, “मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी मनोज जरांगे पाटील रस्त्यावर उतरले. पण, त्यांनी हा विचार करावा की महायुतीने मराठा समाजासाठी काय काय केलं? या सरकारने मराठा समाजाला काय-काय दिलं ते देखील पाहावं. सारथी संस्थेला निधी दिला, आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला भरघोस निधी दिला. एक लाख तरुणांना उद्योग उभारून दिले. आता ओबीसींप्रमाणे मराठा समाजालाही सवलती मिळत आहेत. हे सगळं कोणी केली. मात्र, ज्यांनी मराठा समाजासाठी काहीच केलं नाही, ज्यांनी केवळ समाजाचा वापर केला, ज्यांना समाजातील लोकांना वंचित ठेवलं, त्यांच्याबद्दल विचार करावा. देणारा कोण आणि फसवणारा कोण याचा निर्णय घ्यावा”.