गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. या निमित्ताने शोभायात्रा काढण्याची परंपरा आहे. हिंदू नववर्षाच्या शोभायात्रेत ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सहभागी झाले. त्यांनी लोकांचे, लाडक्या बहिणींचे आभार मानले आहेत. अडीच वर्षांत महायुतीने चांगलं काम केल्याने आम्ही विजयाची गुढी उभारु शकलो असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
ठाण्यातल्या शोभायात्रेत एकनाथ शिंदे सहभागी
ठाण्यातील कोपीनेश्वर मंदिराच्या शोभायात्रेचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. या निमित्ताने अनेक हिंदू बांधव शोभायात्रेत अत्यंत उत्साह आणि आनंदात सहभागी झाले आहेत. विविध चित्ररथ आणि संदेशांचा या शोभायात्रेत समावेश आहे. या शोभायात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर दिग्गजांचीही उपस्थिती होती. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. नव्या सरकारची पहिली इनिंग सुरु झाली आहे आता समृद्धी आणि विकासाच्या गुढ्या उभारणार असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे.
काय म्हणाले एकनाथ शिंदे?
आजचा दिवस मांगल्य आणि पावित्र्याचा दिवस आहे. आज ठाण्यातील कोपीनेश्वर महादेव मंदिराच्या वतीने जी शोभा यात्रा काढली जाते त्याचं २५ वं वर्ष आहे. या शोभायात्रेत लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, अबालवृद्धांपर्यंत सगळेच जण आनंदाने सहभागी होतात. या शोभायात्रेत अनेक चित्ररथ असतात. चित्ररथांमधून सामाजिक संदेश देण्याचं काम, समाज प्रबोधनाचं काम हे दाखवलं जातं. मागच्या अडीच वर्षांत महायुतीने जे काम केलं त्यामुळे विजयाची गुढी आम्हाला उभारता आली. नव्या सरकारची पहिली इनिंग सुरु झाली आहे. समृद्धी आणि विकास यांच्या गुढ्या उभारणार आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ.
आणखी काय म्हणाले एकनाथ शिंदे?
चैत्र नवरात्र उत्सव आहे तो नऊ दिवसांचा उत्सव आहे. राज्यात विकास, लोकांची प्रगती, कायदा-सुव्यवस्था, लाडक्या बहिणी, भाऊ, लाडके शेतकरी या सगळ्यांची प्रगती साधणं हे आमचं ध्येय असणार आहे असंही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह
राज्यभरात गुढीपाडव्याचा उत्साह पाहण्यास मिळतो आहे. मुंबईतील गिरगाव, ठाणे, डोंबिवली आणि महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर या ठिकाणी शोभायात्रांंचा उत्साह दिसून येतो आहे. शोभायात्रांमध्ये लोक अत्यंत उत्साहाने सहभागी झाले आहेत. पारंपरिक वेशभुषा करुन, त्याचप्रमाणे बाईक ऱॅली काढत लोकांचा उत्साह या शोभायात्रांमधून पाहण्यास मिळतो आहे. तसंच आज राज ठाकरे हे मुंबईतल्या शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्क मैदानावर बोलणार आहेत. राज ठाकरे काय बोलणार? याकडेही महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.