ठाणे जिल्हा रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा आज (२२ एप्रिल) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत देखील उपस्थित होते. ठाण्यात मोठं सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारलं जाणार आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेवर भाष्य केलं. तसेच आरोग्य विभागाने गेल्या काही काळात केलेल्या कामांचा पाढा वाचून दाखवला. यासह मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीकाही केली.
दरम्यान, यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, ते तानाजी सावंतांना महाराष्ट्राच्या कॅबिनेटध्ये शिक्षणमंत्री करणार होते. परंतु वादांच्या भितीने ते तसं करू शकले नाहीत. शिंदे म्हणाले की, “तानाजीराव मघाशी म्हणत होते की, त्यांनी साखरेत डॉक्टरी केली आहे. साखरेत डॉक्टरी केल्यामुळे तुमच्यामुळे खूप लोकांची शुगर (साखर) वाढली आहे.”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, तानाजीराव, तुमच्या शैक्षणिक संस्थादेखील खूप आहेत. सुरुवातीला मी असा विचार केला होता की, तुम्हाला शिक्षमंत्री करायचं. पण मग ज्याच्या शिक्षणसंस्था जास्त त्याला शिक्षणमंत्री केलं तर कॉन्ट्रोव्हर्सी (वाद) होते. म्हणून तसं करता आलं नाही. सामान्य माणसाला सेवा देणारा हा आरोग्य विभाग आहे. तुम्ही या विभागात उत्तम काम करत आहात.
हे ही वाचा >> “लोक आम्हाला गौतमी पाटीलचे व्हिडीओ दाखवून…” तमाशा कलावंतांनी मांडली खंत, म्हणाले, “तिचे चाळे…”
एकनाथ शिंदेंची विरोधकांवर टीका
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आपण उभारत असलेल्या या नव्या रुग्णालयामुळे हजारो, लाखो लोकांना दिलासा मिळाला आहे. याशिवाय आपलं सरकार आरोग्याच्या क्षेत्रात मोठं काम करत आहे. आपण रुग्णवाहिका वाटप करतोय, राज्यात हिरकणी कक्ष सुरू केले आहेत. परंतु आपल्या या कामांमुळे अनेकांना पोटदुखी होत आहे. त्यांच्यावर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना येथे मोफत उपचार केले जातील. जनतेला सेवा पुरवणं हेच आपलं काम आहे.