राज्यातल्या शिंदे-फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झालं. यानिमित्त ठाण्यातल्या टेंभी नाका येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक वर्षभरापूर्वी (महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या काळात) शिवसेना आणि भाजपाच्या गोटात काय घडलं याबाबत बरीच माहिती उलगडून सांगितली. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, महाविकास आघाडीच्या काळात राज्यातल्या जनतेचं जगणं असहाय्य झालं होतं. लोकांचा श्वास गुदमरू लागला होता. आपल्या आमदारांचा श्वास गुदमरू लागला होता. आपले शिवसेनेचे सगळे आमदार, त्यांच्या भावना, त्यांच्या मतदार संघातले विषय, महाविकास आघाडीत होणार त्रास सहन करत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होता खरा, परंतु राज्यात शिवसेनेचं आणि शिवसैनिकांचं खच्चीकरण होत होतं. त्यामुळे शिवसेना वाचवण्यासाठी, शिवसैनिकांचं, शिवसेनेच्या आमदारांचं खच्चीकरण थांबवण्यासाठी मला त्यावेळी भलतंच धाडस करावं लागलं. ते धाडस सोपं नव्हतं. महाराष्ट्रातील जनतेच्या मनात, शिवसैनिकांच्या मनात, आमदारांच्या मनात जे काही घडत होतं, या सगळ्यांचा मनात जो उद्रेक होता त्याला वाचा फोडण्याचं काम त्यावेळी या एकनाथ शिंदेने केलं. हे धाडस संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेने, देशाने आणि जगानेही पाहिलं आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, आम्ही मोठं धाडस केलं. मग हे सरकार स्थापन झालं. सरकार स्थापन झाल्यापासून गेल्या वर्षभरात आपल्या सरकारने अनेक मोठे निर्णय घेतले. यशस्वीपणे सर्वांसाठी कामं केली. सुरुवातीच्या मंत्रिमंडळात मी आणि देवेंद्र फडणवीस आम्ही दोघेच होतो, तरीदेखील लोकहिताचे निर्णय घेतले. तो धाडसी निर्णय घेतला तेव्हाचा प्रसंग बाका होता. काही लोक आपल्या पाठिशी अगदी मनापासून होते. तर काही जण विचार करत होते की, आता पुढे काय होणार, एकनाथ शिंदेंचं काय होणार, त्या ५० आमदारांचं काय होणार? परंतु मी त्याची फिकीर केली नव्हती. मी माझ्या राजकीय जीवनात कुठलाही निर्णय घेताना कधीही मागचा पुढचा विचार केला नाही. सगळे निर्णय धाडसाने घेतले. कारण हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद माझ्याबरोबर होते, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं पाठबळ होतं.

एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, त्या काळात (बंडखोरी झाली तेव्हा) तुम्हाला माहिती आहे की लोकांच्या मनात अनेक प्रश्न होते. कोणाला वाटलं नव्हतं, अगदी मलाही वाटलं नव्हतं की, राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मला जबाबदारी पार पाडावी लागेल. परंतु बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन गेल्यानंतर आणि असं धाडस केल्यावर, त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेबांनी मला मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली. मी त्यांना धन्यवाद देतो. या काळात भाजपाने खूप सहकार्य केलं. देवेंद्र फडणवीस पाठिशी उभे राहिले. त्यांचे आभार मानतो.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde says i did not think i will become chief minister asc
Show comments