छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भूमीत मराठ्यांचे आरमार उभारून आपल्या दूरदृष्टीचा प्रत्यय दिला होता, त्या कोकण भूमीवर आज (४ डिसेंबर) भारतीय नौदलाच्या वतीने नौदल दिन साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला नरेंद्र मोदी यांनी सिंधुदुर्गच्या समुद्रकिनारी राजकोट येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या ४३ फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले. भारतीय नौदलातील जवानांनी नौदलाच्या सामरिक सामर्थ्याचे दर्शन घडवले. या कार्यक्रमाला पंतप्रधानांसह संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हजेरी लावली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, देशतील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. यापैकी राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये लोकांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींची जादू पाहिली. या विजयासाठी मोदी यांचं अभिनंदन. हा नौदलाचा कार्यक्रम आहे. परंतु, हा कालच मिळालेला विजय आहे, त्याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. कालच्या निकालातून एक गोष्ट देशातल्या नागरिकांनी सिद्ध केली की, देशात गॅरंटीचं दुसरं नाव म्हणजे मोदी.
एकनाथ शिंदे म्हणाले, जनता आणि त्यांची मनं जोडणारे पंतप्रधान महाराष्ट्रात आले आहेत. काल निवडणुकीच्या निकालात आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट पाहिली. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या देशाचं नाव मोठं केलं आहे. जगभरात सन्मान वाढवला आहे. आपल्या देशाची अर्थव्यवसथा बळकट केली आहे.
या कार्यक्रमासाठी सिंधुदुर्गची निवड का झाली?
भारतीय आरमार उभारणीतील छत्रपती शिवाजी महाराज यांचे योगदान आणि त्यांच्या राज्याभिषेकाचे ३५० व्या वर्षाचे औचित्य साधून यंदाचा नौदल दिन सिंधुदुर्ग येथे साजरा होत आहे. यासाठी नौदलाने अनेक जलदुर्गांची पाहणी केल्यानंतर छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याची निवड केली. सिंधुदुर्ग किल्ला भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाची साक्ष देतो. शिवछत्रपतींनी पायदळ व घोडदळाप्रमाणे मराठ्यांचे आरमार सुसज्ज करत स्वराज्य बळकट केले. सिद्दी, इंग्रज आणि पोर्तुगीजांना शह देण्यासाठी सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, पद्मदुर्ग असे अनेक जलदुर्ग उभारले. त्यांची उभारणी करताना शत्रूची जहाजे जलदुर्गाजवळ येण्यापूर्वीच क्षतिग्रस्त होतील, याची चोख व्यवस्था केली. जहाज बांधणीचे काम समांतरपणे हाती घेतले. गलबते, तोफा ठेवता येईल, असे गुराब त्यांच्या आरमाराचा भाग होते. सैनिकांची वाहतूक करण्यासाठी तरांडी तर माल वाहतुकीसाठी शिबाड जहाज वापरली गेल्याचे उल्लेख आहेत. सुमारे ४०० जहाजांच्या बळावर महाराजांनी कारवारपर्यंतचा कोकण किनारा आपल्या आधिपत्याखाली आणला.