Eknath Shinde Speech in Maharashtra Assembly Session : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना मविआमधील नेत्यांनी भाजपा नेत्यांना तुरुंगात टाकण्याची योजना आखली होती, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेकदा केला आहे. दरम्यान, शिंदे यांनी आज (१२ जुलै) यावर सविस्तर भाष्य केलं. एकनाथ शिंदे विरोधकांना उद्देशून म्हणाले, “तुम्ही भाजपावर, एनडीए सरकारवर आरोप करताय, त्यांनी सुडाचं राजकारण केल्याचा आरोप करताय, मात्र सुडाचं राजकारण भाजपाने नव्हे तर महाविकास आघाडीतल्या लोकांनी त्यांचं सरकार असताना केलं होतं. त्यांचं अडीच वर्षांचं सरकार होतं, आम्ही त्या सरकारमध्ये होतो. आम्ही ते राजकारण जवळून पाहिलं आहे. आम्ही त्या लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने काही फरक पडला नाही.”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस आहे. तसेच शिंदे-फडणवीस-पवार सरकारच्या कार्यकाळातलं हे शेवटचं अधिवेशन आहे. या अधिवेशनाच्या समारोपाच्या भाषणात एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यांनी राज्यात सुडाचं राजकारण केलं होतं. भाजपा नेते नारायण राणे मुख्यमंत्र्यांविरोधात बोलले म्हणून त्यांना जेवणाच्या ताटावरून उठवून अटक केली. हनुमान चालीसा वाचणाऱ्या खासदार नवनीत राणा व त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. देशद्रोहाचे कलम लावून त्या दोघांना १२ दिवस तुरुंगात डांबलं. अभिनेत्री कंगणा रणौतचं घर तोडलं. तिच्याविरोधातील खटला लढण्यासाठी वकिलांना ८० लाख रुपये त्यांचं शुल्क म्हणून दिले. नौदलाच्या अधिकाऱ्याला मारलं. हे सगळं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं सुडाचं राजकारण होतं.”

मुख्यमंत्री शिंदे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते नाना पटोलेंचा उल्लेख करत महाविकास आघाडीच्या नेत्यांना उद्देशून म्हणाले, “तुम्ही लोक मंत्री गिरीश महाजन यांना तुरुंगात टाकणार होतात. देवेंद्र फडणवीस यांचा चौथा नंबर होता. अनेकांना पटणार नाही. परंतु, सर्व गोष्टी पडद्यामागे घडत होत्या. मी आणि अजित पवार त्या लोकांना रोखू पाहत होतो. असं करू नका म्हणून सांगितलं होतं. परंतु, त्यांनी आमचं काही ऐकलं नाही. मी या लोकांना सांगायचो, वर (दिल्लीत) दोन जण (पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह) बसलेत, त्यांचा बुलडोझऱ येईल.”

देवेंद्र फडणवीस – एकनाथ शिंदे

हे ही वाचा >> Sanjay Raut : “आपण एकत्र यायलाच पाहिजे”, असं म्हणत राऊतांचं चंद्रकांत पाटलांना आलिंगन; भाजपा नेते म्हणाले…

एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?

एकनाथ शिंदे म्हणाले, याच काळात मला एक गोष्ट समजली होती की हे लोक (मविआ नेते) माझ्यासह अनेकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मग त्याच दिवशी आम्ही एक धाडसी निर्णय घेतला. सत्तेवर लाथ मारून आम्ही सत्तेतून पायउतार झालो आणि राज्यात इतिहास घडवला. सरकारमधून बाहेर पडायला हिम्मत लागते, ती हिम्मत आम्ही दाखवली आणि जनतेच्या मनातलं सरकार आणलं. लोकांनी विधानसभा निवडणुकीत ज्यांना बहुमत दिलं होतं, त्यांचं सरकार आणलं. आमचं हे सरकार दोन वर्षे चाललं. दोन वर्षांत आम्ही अनेक चांगले निर्णय घेतले, लोकांची कामं केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde says mva leaders was going to put devendra fadnavis in jail asc
Show comments