शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी स्वत:च्या पक्षाविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेच्या विधीमंडळ पक्ष कार्यलयामधून जारी करण्यात आलेले शिवसेनेच्या विधीमंडळ बैठकीसंदर्भातील आदेश बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदेंनी केलाय. पाच वाजेपर्यंत शिवसेना आमदारांना उपस्थित राहण्याचे आदेश हे बेकायदेशीर असल्याचं शिंदेंनी म्हटलंय. सुनील प्रभू यांनी काढलेले आदेश हे अवैध असल्याचा दावा शिंदेंनी ट्विटरवरुन केलाय. शिंदे हे सध्या शिवसेनेचे ३३ बंडखोर आमदार आणि अपक्ष आमदारांसहीत एकूण ४६ विधीमंडळ सदस्यासोबत गुवहाटीमध्ये आहेत. ठाकरे सरकारविरोधात बंड पुकारणाऱ्या शिंदेंनी आता थेट शिवसेनेच्या आदेशालाच आव्हान दिलंय.

नक्की वाचा >> ‘संजय राऊत प्रत्यक्षात..’, ‘मंत्रीपद नको पण..’, ‘माझे पुतळे का..’, ‘अन्यथा मी..’; कॉलदरम्यान शिंदेंकडून मुख्यमंत्र्यांवर प्रश्नांचा भडिमार

एकनाथ शिंदे यांनी दुपारी तीन वाजून २९ मिनिटांनी एक ट्विट केलं असून यामधून त्यांनी शिवसेनेकडून जारी करण्यात आलेला व्हीप कायद्याला धरुन नसल्याचा दावा केलाय. “शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत,” असं ट्विट एकनाथ शिंदेंनी केलं आहे.

नक्की पाहा >> Video: “…तर बाळासाहेब ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या कानाखाली जाळ काढला असता”

शिवसेनेचे प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांनी शिवसेनेच्या आमदारांसाठी नोटीस जारी केली आहे. या नोटीशीमध्ये, “पक्षांतर घडवून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न होत असल्याने राज्यात निर्माण झालेली राजकीय परिस्थिती लक्षात घेता अशा परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी २२ जून २०२२ रोजी माऊंट प्लेझंट रोडवरील वर्षा बंगल्यावर सायंकाळी पाच वाजता तातडीची बैठक आयोजित केली आहे,” शिवसेनेनं म्हटलंय. तसेच या बैठकीस सर्व आमदारांची उपस्थिती आवश्यक आहे, असंही शिवसेनेनं आमदारांसाठी जारी केलेल्या आदेशात म्हटलं आहे. या बैठकीला लिखित स्वरुपात वैध आणि पुरेशी कारणे प्रदान केल्याशिवाय गैरहजर रहाता येणार नाही, असाही इशारा या नोटीशीमध्ये देण्यात आलाय.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंची आदित्य ठाकरे, संजय राऊतांसोबत बाचाबाची; दोन दिवसांपूर्वीच पडलेली वादाची ठिणगी

या बैठकीस आमदारांनी उपस्थित न राहिल्यास स्वेच्छेने शिवसेना पक्षाच्या सदस्यत्व सोडण्याचा तुमचा स्पष्ट इरादा आहे असे मानले जाईल आणि परिणामी आपणावर भारतीय संविधानातील सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात असलेल्या तरतूदीनुसार कारवाई करण्यात येईल, असं सांगण्यात आलंय.

नक्की वाचा >> राजकीय घडामोडींचा योगा’योग’ अन् खुर्ची! ऋषिकेश जोशीच्या पोस्टवर विश्वास नांगरे-पाटलांची कमेंट; म्हणाले, “भावा, खुर्ची…”

दरम्यान, आज दुपारी एक वाजता पार पडलेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील राजकीय संकाटासंदर्भात कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही असं सांगण्यात येत आहे.