Eknath Shinde Shivsena Demands Home Ministry : महायुतीने सरकार स्थापनेच्या दिशेने पावलं टाकण्यास सुरुवात केली आहे. भाजपाचा नेता मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर आता शिवसेना (शिंदे) पक्षप्रमुख तथा राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीकडे राज्याचं गृह व महसूलमंत्रीपद मागितल्याची चर्चा आहे. मात्र भाजपाने त्यास विरोध दर्शवल्यामुळे शिंदे नाराज असल्याचं बोललं जात आहे. शिंदे नाराज होऊन साताऱ्यातील त्यांच्या दरेगावी निघून गेल्याची चर्चा आहे. मात्र, एकनाथ शिंदे नाराज नाहीत असं आमदार गुलाबराव पाटील यांनी ठामपणे सांगितलं. “एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा प्रश्नच येत नाही. मुळात तो शब्द त्यांच्या शब्दकोशातच नाही”, असं वक्तव्य पाटील यांनी केलं आहे. गुलाबराव म्हणाले, “राज्यातील जनतेने अडीच वर्षांत एकनाथ यांना इतकं प्रेम दिलं आहे की त्यांच्या नाराजीचा प्रश्नच येत नाही”.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी गृह व महसूल खातं मागितल्याच्या चर्चेवर गुलाबराव पाटील म्हणाले, “एखादं खातं मागणं ही काही चुकीची गोष्ट नव्हे. प्रत्येक पक्षाचं ते काम आहे. शेवटी आम्ही महायुतीत तीन महत्त्वाचे पक्ष आहोत. प्रत्येकाला सत्तेत आपापला वाटा हवा आहे. त्यामुळे युतीत, आघाडीत एखादं खातं मागू नये असं कोणी सांगितलेलं नाही. मागितल्यावर मिळेलच असंही काही नाही. मात्र, आम्ही आम्हाला हवं ते खातं मागू. त्यावर वरिष्ठ नेते निर्णय घेतील आणि ते निर्णय आम्हा सर्वांना मान्य असतील”.
हे ही वाचा >> Ladki Bahin Yojna : लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं…
गुलाबरावांचा उद्धव ठाकरेंना चिमटा
दरम्यान शिवसेनेचे (उबाठा) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे की बहुमत मिळाल्यानंतर सरकार स्थापन करायचं सोडून एकनाथ शिंदे शेतीच्या नावाखाली गावी निघून गेले आहेत. हे अशोभनीय आहे. त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, “जे शेतात राहतात त्यांना शेत कळतं. महालात राहणाऱ्यांना शेत काय कळणार? मातीशी जोडलेला माणूसच नेता होऊ शकतो”.
हे ही वाचा >> “माजी सरन्यायाधीश चंदचुडांनी देशात आग लावली”, महाराष्ट्र व संभलचं उदाहरण देत ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप
आदित्य ठाकरेंना जशास तसं उत्तर
दुसऱ्या बाजूला वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी अमावस्या पौर्णिमेला एकनाथ शिंदे नेमकी कोणती शेती करतात? असा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, “आदित्य ठाकरे हा सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेला नेता आहे. त्याला आंदोलन वगैरे काय माहिती. आम्ही आंदोलनं करून त्याला मोठं केलं आहे. शिवसेना मोठी करण्यात जे लोक होते आज ते कुठे आहेत? त्यांचा साधा उल्लेखही होत नाही. शिवसेनेचा जो महाल उभा आहे त्यात एक वीट आमची देखील आहे. परंतु, उद्धव ठाकरे त्या विटांना विसरून संजय राऊत नावाचा दगड घेऊन आले आहेत. त्या दगडाने उद्धव ठाकरेंच्या महालाचा संपूर्ण सत्यानाश केला आहे”.