Eknath Shinde Shivsena Minister Gulabrao Patil : “दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येणारे इथे चुकीच्या पद्धतीने वागत असतील तर त्यांना ठोकलं पाहिजे”, असं वक्तव्य शिवसेनेचे (शिंदे) मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे. “दुसऱ्या राज्यातून इथे येणाऱ्यांनी महाराष्ट्रात सरळ राहावं अन्यथा त्यांना चोप दिला जाईल”, असंही पाटील म्हणाले. कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला परप्रांतीयांनी केलेल्या मारहाणीच्या प्रकरणावर पाटलांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कल्याणच्या योगीधाम परिसरातील एका सहकारी गृहनिर्माण संस्थेत मराठी कुटुंबाला अखिलेश शुक्ला नावाच्या एका व्यक्तीने जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. या मारहाणीत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना १० ते १२ टाके पडले आहेत. या प्रकरणातील मराठी विरुद्ध अमराठी, शुक्लाला त्याचा प्रशासनाशी थेट संबंध असल्याचा गर्व आणि त्यातून त्याने मराठी कुटुंबाला दिलेली धमकी या बाबीही आता चर्चेत आल्या आहेत. सोसायटी व परिसरातील रहिवाशांनी यासंदर्भात मारहाण करणाऱ्या संबंधित व्यक्तीविरोधात तक्रारींचा पाढाच वाचला आहे. त्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, या प्रकरणावर भाष्य करताना गुलाबराव पाटील म्हणाले, “ज्या मातीत राहता, खाता-पिता, पैसे कमवता तिथल्या लोकांबरोबर कोणी अशा पद्धतीने वागत असेल तर त्यांना ठोकलं पाहिजे. जनतेनेच त्यांना नीट केलं पाहिजे. मुंबई ही सर्वांना सामावून घेते. इथे पोट भरण्यासाठी, उपजीविकेसाठी वेगवेगळ्या राज्यातील लोक येतात. परंतु, तुम्ही इथे येऊन इथल्याच लोकांना वाईट बोलत असाल, मारत असाल तर कोणताच मराठी माणूस हे सहन करणार नाही. इथे येणाऱ्यांनी सरळ राहावं, अन्यथा त्यांना चोप दिला जाईल”.

हे ही वाचा >> “तुम्ही किंवा तुमच्या तीर्थरुपांनी…”, अशोक चव्हाणांचा तो फोटो पाहून ठाकरे गटाचा संताप; म्हणाल्या, “खायचं कुडव्याचं अन्…”

नेमकी घटना काय?

योगीधाम परिसरातल्या अजमेरा सोसायटीमध्ये एका अमराठी व्यक्तीने गुंडांची डोळी बोलावून त्याच्या शेजारी राहणाऱ्या मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. अखिलेश शुक्ला व विजय कळवीकट्टे हे सख्खे शेजारी. पण त्यांच्यात एका किरकोळ कारणावरून मोठा वाद झाला. शुक्ला यांच्या पत्नी घराबाहेर लावत असलेल्या धूपच्या धुरामुळे कळवीकट्टे कुटुंबातील लहान मूल व वृद्ध व्यक्तीला त्रास होत होता. त्यामुळे त्यांच्याकडून वारंवार यासंदर्भात शुक्ला यांना सांगितलं जात होतं. मात्र, यावरून त्यांच्यात मोठा वाद निर्माण झाला. शिवीगाळ, मारहाणीपर्यंत प्रकरण गेलं. त्याच मजल्यावर राहणारे अभिजीत देशमुख व धीरज देशमुख यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा राग धरून शुक्ला यांनी अभिजीत देशमुख यांनाच मारहाण केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde shivsena gulabrao patil angry on kalyan shukla case non marathi attack on marathi family asc