बॉलिवूड अभिनेता आणि माजी खासदार गोविंदाने आज (२८ मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (बाळासाहेबांची शिवसेना) प्रवेश केला. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. एकनाथ शिंदे यांनी गोविंदाचं शिवसेनेत स्वागत केलं. मागील काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा राजकारणाच्या मैदानात उतरणार असल्याच्या चर्चा चालू होत्या. त्यानंतर अखेर आज गोविंदाने शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेत या चर्चा खऱ्या ठरवल्या. गोविंदाला शिवसेनेकडून मुंबईतल्या उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाईल असं बोललं जात आहे. परंतु, एकनाथ शिंदे आणि गोविंदाने या खोट्या अफवा असल्याचं म्हटलं आहे.
२००४ च्या लोकसभा निवडणुकीत गोविंदाने काँग्रेसच्या तिकीटावर उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपाच्या राम नाईक यांचा पराभव केला होता. २००९ मध्ये तो निवडणूक लढला नाही. त्यानंतर त्याने राजकारणातून काढता पाय घेतला. आता त्याने पुन्हा एकदा राजकारणाच्या मैदानात उडी घेतली आहे. परंतु, तो निवडणूक लढणार की नाही याबाबत अद्याप संभ्रमाचं वातावरण आहे.
गोविंदाच्या पक्षप्रवेशावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आज शिवजयंतीच्या (तिथीनुसार) अत्यंत पवित्र दिनी आपले सर्वांचे लाडके आणि लोकप्रिय बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मी आपल्या पक्षात त्यांचं मनापासून स्वागत करतो. त्यांचे पाय नेहमीच जमिनीवर असतात. त्यामुळेच ते सर्व समाजात लोकप्रिय आहेत. शिवसेनेत आल्याबद्दल मी गोविंदा यांचं स्वागत करतो आणि शुभेच्छाही देतो.
दरम्यान, गोविंदाच्या शिवसेना प्रवेशावरून शिवसेनेवर आणि गोविंदावरही टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर भाष्य केलं आहे. जयंत पाटील म्हणाले, गोविंदा यांचे चित्रपट आता चालत नाहीत. त्यांचा शेवटचा चित्रपट आपटल्यानंतर त्यांना काहीतरी हवं होतं. तसेच शिंदे गटाने एखादा चालणारा तरी नट घ्यायला हवा होता.
जयंत पाटलांच्या गोविंदावरील टीकेला एकनाथ शिंदेंचं उत्तर
गोविंदाच्या पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयंत पाटलांच्या टीकेला उत्तर दिलं. शिंदे म्हणाले, “गोविंदा हा जयंत पाटलांपेक्षा चांगला कलाकार आहे.” शिंदेंचं वक्तव्य ऐकून सभागृहात एकच हशा पिकला. त्यानंतर ते म्हणाले, कोणीही कलाकारांचा अपमान करू नये. कारण माणसाचे दिवस कधी फिरतात हे कोणालाही माहिती पडत नाही. एका कलाकाराचा अपमान म्हणजेच संपूर्ण चित्रपटसृष्टीचा अपमान. कलाकारांविरोधात बोलणाऱ्यांना भोगावं लागू शकतं.
हे ही वाचा >> भाजपाच्या राम नाईकांचा दणदणीत पराभव केलेला गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेत
पक्षप्रवेशानंतर गोविंदा काय म्हणाला?
दरम्यान, शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर गोविंदा म्हणाला, मी आज या पक्षात आलो आहे. १४ वर्षांचा वनवास संपला आहे आणि रामराज्यात आलो आहे असं मला वाटतं आहे. जी जबाबदारी मला दिली जाईल ती प्रामाणिकपणे पार पाडेन असं गोविंदाने म्हटलं आहे.