अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या आर्थिक वर्ष २०२३-२४ साठीचा अर्थसंकल्प सादर केला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बातचित केली. यावेळी शिंदे यांनी फडणवीस यांचं कौतुक केलं. तसेच अर्थसंकल्पावरून राज्य सरकारवर टीका करणाऱ्या विरोधाकांचादेखील समाचार घेतला. अर्थसंकल्पाचं गाजर हलवा असं वर्णन करणाऱ्या उद्धव ठाकरेंना शिंदे म्हणाले की, “खरंतर आम्ही गाजर हलवा तरी देतोय, पण त्यांनी काहीच दिलं नाही. त्यांनी फक्त स्वतःचं खाल्लं, दुसऱ्याला काहीच दिलं नाही.”
दरम्यान, विरोधी पक्षांनी महामंडळांच्या स्थापनेवरून सरकारला सवाल केले आहेत. याबाबत माध्यमांच्या प्रतिनिधीनी एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारल्यानंतर शिंदे म्हणाले की, ही महामंडळं सर्व समजांना न्याय देण्यासाठी आहेत, त्याबद्दल विरोधकांना पोटदुखी का? त्यांच्याकडे बोलायला जागा नाही, त्यामुळे त्यांचा करेक्ट कार्यक्रम देवेंद्रजींनी करून टाकला आहे.
एकनाथी शिंदे म्हणाले की, “आमचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे. आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाद्वारे सरकारने सर्व समाजघटकांना न्याय देण्याचं काम केलं आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी राज्यात ‘नमो शेतकरी’ योजना सुरू करण्यात आली आहे. ही एक ऐतिहासिक योजना आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार मिळेल. राज्यातल्या आत्महत्या थांबवणे हे या योजनेचं प्रमुख उद्दीष्ट आहे.”
हे ही वाचा >> फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला; अजित पवारांचा राज्य सरकारला टोला
कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतूद
शिंदे म्हणाले की, “नमो शेतकरी महासन्मान निधीचा दीड कोटी शेतकऱ्यांना लाभ होणार असून महाकृषी विकास अभियान योजनेमुळे राज्यात क्रांती होणार आहे. केवळ एक रुपयात पिक विमा घेता येणार असल्याने मोठा दिलासा शेतकऱ्याला मिळणार आहे. मागेल त्याला शेततळे या योजनेचा विस्तार करणे असो किंवा विदर्भ, मराठवाड्यातील केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देणे असो, ५००० गावांत जलयुक्त शिवार, सिंचनाचे विविध प्रकल्प पूर्ण करणे यासाठी या अर्थसंकल्पात केलेली तरतूद निश्चितच भरीव आहे.”