Eknath Shinde on Ravi Rana and Mahayuti : “रवी राणांनी महायुतीची शिस्त पाळावी, महायुतीत मिठाचा खडा टाकू नये”, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बडनेराचे आमदार रवी राणा यांना इशारा दिला आहे. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील रवी राणा यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. रवी राणांच्या युतीविरोधातील कारवायांवर अजित पवारांनी ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ अशी स्थिती असल्याची टिप्पणी केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः रवी राणांना समजावलं पाहिजे, असंही पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, “मागे मला आनंदराव अडसुळांनी सांगितलं होतं, रवी राणा त्यांच्याविरोधात काम करत आहेत. आत्ताही तसंच चाललं. या गोष्टी महायुतीसाठी चांगल्या नाहीत”.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मी सर्वांना सांगतो महायुती या विधानसभा निवडणुकीत मजबुतीने लढत आहे. युतीत कुणीही मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नये. मी राणा परिवाराला सांगतो, तुम्ही महायुतीचे घटक आहात. सरकार तुमच्या मागे उभं आहे. तुम्ही सरकार आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या उमेदवारांना तुम्ही मदत केली पाहिजे. त्यामुळेच मी तुम्हाला सांगतो. तुम्ही महायुतीची शिस्त पाळली पाहिजे. युतीत राहायचं युतीविरोधात काम करायचं हे चालणार नाही. कोणीही हे असं करता कामा नये”.
हे ही वाचा >> “मराठा मतं बोटांवर मोजण्याइतकी…”, व्हिडीओ व्हायरल होताच बबनराव लोणीकरांचं स्पष्टीकरण
रवी राणांवर टीका का होतेय?
अमरावती शहर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) उमेदवार सुलभा खोडके यांच्या प्रचाराबाबत प्रश्न विचारल्यावर “अमरावतीची एक जागा निवडून आली नाही तर काही फरक पडणार नाही’, असं वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं होतं. त्यावरून आता त्यांच्यावर महायुतीतील नेत्यांकडून टीका होऊ लागली आहे.
हे ही वाचा >> Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची खोचक शब्दांत टीका, “महायुतीला मत म्हणजे गुजरातला मत, कारण..”
अजित पवारांची नाराजी
रवी राणांच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले, रवी राणा विनाशकाले विपरीत बुद्धी अशी त्यांची स्थिती झाल्यासारखे वागत आहेत. त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं. त्यांच्या अशा बोलण्यानेच लोकसभेला त्यांच्या पत्नीचा पराभव झाला. मी दोन विधानसभा निवडणुकांमध्ये रवी राणांचं समर्थन केलं होतं. पण आता त्यांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. आम्ही आमचा उमेदवार चांगल्या मताने निवडून आणण्याचा प्रयत्न करणार आहे.