अजित पवारांनी सादर केलेला अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे. आमचं सरकार हे सामान्यांचं सरकार आहे. महिला, शेतकरी, युवा, कष्टकरी, ज्येष्ठ नागरिक, वारकरी सगळेच त्यात आले. त्यांच्यासाठीच्या घोषणा करण्यात आल्या. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसंच ते पुढे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वात मोठी घोषणा आहे. १५०० रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा होणार. तीन सिलिंडर मोफत दिली जाणार आहेत. त्यामुळे विरोधक गॅसवर आले आहेत. युवकांसाठी रोजगाराच्या योजना मिळाल्या आहेत. जर्मनीत चार लाख नोकऱ्यांसाठी एमओयू झाला आहे. बेरोजगारांना दहा हजार रुपये दिले जातील अशीही तरतूद केली आहे.
काहींनी लाडका बेटा योजना अडीच वर्षे राबवली
लाडकी बहीण योजनेप्रमाणे आम्ही लाडका भाऊ योजनाही आणली. मात्र आम्हाला नावं ठेवणाऱ्यांनी लाडका बेटा योजना अडीच वर्षे राबवली त्याचं काय? असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना केला आहे. शेतकऱ्यांसाठीही अनेक योजना राबवल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेती पंपावर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री बळीराजा योजना आम्ही सुरु केली. मुलींचं शिक्षण मोफत दिलं जाणार आहे. या योजनांच आज प्रामुख्याने निर्णय घेतला आहे. अजित पवारांचा अर्थसंकल्प आहे. दादा वादेका पक्का है असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हे पण वाचा- Maharashtra Assembly Budget 2024-2025: अजित पवारांची वारकऱ्यांसाठी मोठी घोषणा, प्रति दिंडी देणार ‘इतका’ निधी
आम्ही शेतकऱ्यांसह सगळ्यांसाठीच उत्तम योजना राबवत आहोत
अर्थसंकल्पात पैशांची योग्य तरतूद करुन आम्ही या योजना राबवत आहोत. सोयाबीन आणि कापसासाठी साडेचार हजार कोटींची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांना काय दिलं विचारणाऱ्यांना मी सांगू शकतो आम्ही मागच्या दोन वर्षांत सगळे निकष बदलले. ४५ हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना देणारं आमचं सरकार आहे. आम्ही हिशोब द्यायला तयार आहोत. जे काही बोलतात ते खोटं बोला आणि रेटून बोलणारे त्याबाबत तुम्ही आम्हालाही विचारत जा. खत आणि बियाणांवर जीएसटी आहे सांगतात पण खतांवर जीएसटीही नाही. आता या लोकांना जनता फसणार नाही.
औरंगजेब, याकूब मेमन यांना फादर मानणाऱ्यांना…
आमचा अर्थसंकल्प पाहून त्यांचे चेहरा पांढरा पडला होता. विधानसभेत आम्ही जे काम केलं आहे त्याची पोचपावती लोक आम्हाला देतील. औरंगजेब आणि याकूब मेमन यांना मनाने ज्यांने फादर मानलंय त्यांना चादरीशिवाय काय दिसणार? लोकसभा निवडणुकीत काय मिळवलं? मोदींना हटवण्यासाठी जंग जंग पछाडलं. पण मोदी पंतप्रधान झाले. तुम्ही ४० वरुन ९९ वर पोहचले. त्याचे वेड्यासारखे पेढे कसले वाटत आहात? असा बोचरा प्रश्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विचारला. हरले म्हणून पेढे वाटत आहात की विरोधी पक्षनेता पद इतक्या वर्षांनी मिळालं म्हणून पेढे वाटत आहात? हसावं की रडावं अशी स्थिती आहे. असाही टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.