Eknath Shinde विरोधक दररोज सकारात्मक गोष्टींकडे, विकासाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहेत. संविधान आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा विरोधकांकडून नेहमी मारल्या जातात. पण संविधानावर कारभार आम्ही करत आहोत. असं म्हणत महाविकास आघाडीच्या कार्यकाळात काय घडलं त्याचा पाढाच एकनाथ शिंदेंनी विधान परिषदेत वाचला. तसंच उद्धव ठाकरेंवरही टीका केली.

एकनाथ शिंदे यांनी भाषणात काय म्हटलं?

एकनाथ शिंदे म्हणाले, “मर्चंट नेव्हीच्या अधिकाऱ्याला मारताना कुठे होतं तुमच्या हातातलं संविधान? प्रदीप मोरेला मारलं तेव्हा संविधान कुठे होतं? केतकी चितळेला तुरुंगात डांबलं तेव्हा संविधान कुठे होतं? मलिष्काच्या गाण्यामुळे तुम्हाला पोटदुखी झाली तेव्हा संविधान कुठे होतं? हनुमान चालीसा म्हटली म्हणून राणा दाम्पत्याला तुरुंगात धाडलं तेव्हा संविधान कुठे होतं? खोट्या केसेस करुन देवेंद्र फडणवीसांना तुरुंगात पाठवण्याचं षडयंत्र रचलं तेव्हा कुठे होतं संविधान? उद्योजकाच्या घरासमोर बॉम्ब पेरताना कुठे होतं संविधान? वाझे हा काही लादेन नाही म्हणताना संविधान आठवलं नाही का? नारायण राणेंना अटक करताना संविधान आठवलं नाही का? कंगनाच्या ऑफिसवर बुलडोझर चालवला तेव्हा कुठे होतं संविधान? फडतू म्हणाले त्यांच्या पायाशी लोटांगण घालताना संविधान कुठे होतं?” असे तिखट प्रश्न एकनाथ शिंदेंनी उपस्थित केले आहेत.

या प्रश्नांची उत्तरं द्या, एकनाथ शिंदेंचं वक्तव्य

संविधानचा गळा घोटला असं जे आता म्हणत आहेत त्यांनी या प्रश्नांची उत्तरं द्यायला पाहिजे. बरेच उद्योग आहेत ते आम्ही काढत नाही. ते बाहेर काढलं कोरं संविधान घेऊन कुठे पळावं लागेल तुम्हाला? आता हल्ली कुणीही येतो आणि संविधान दाखवतो. मी इतकंच सांगतो की कार्यकर्त्यांनी पेटवा मशाल आम्ही बंगल्यात झोपतो खुशाल ही पद्धत झाली आहे. बाळासाहेब ठाकरे कार्यकर्त्यांच्या मागे उभे राहिले होते म्हणून शिवसेना मोठी झाली. बोलताना, आरोप करताना काहीही बोलत आहेत. झाली ना अडीच वर्षे, कोण खरं आहे, कोण काम करतं आहे ते लोकांना समजलं आहे असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंनाही टोला लगावला.

मिस्टर बिननी बाळासाहेबांची शिवसेना काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती-एकनाथ शिंदे

काही लोक मिस्टर बिन आहेत. मिस्टर बिन आहेत ना, सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजण्याची जी वृत्ती आहे त्यामुळेच सगळेजण गेले. कचऱ्यातून जी एनर्जी निर्माण झाली त्याचा हायव्होल्टेज शॉक बसला. बाळासाहेबांची शिवसेना त्यांनी काँग्रेसच्या डस्टबिनमध्ये टाकली होती. ती आम्ही सुरक्षित बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. डस्टबीनमध्ये कोण बसलं होतं ते कुणी पाहिलं नाही. पण बाहेर आल्यावर घाम कुणाला फुटला हे पाहिलं, तीन ग्लास पाणी प्यायले, चहा मागवा सांगितलं. चहा कुठला होता? वाघबकरी चहा. मला जास्त बोलायला लावू नका. बात निकली तो दूर तक जाएगी. असंही एकनाथ शिंदे म्हणाले.