मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (०६ जून) सावंतवाडीतील विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी आयोजित कार्यक्रमात एकनाथ शिंदे म्हणाले, आमचं सरकार सर्वसामान्यांसाठी काम करत आहे. आपल्या या कोकणाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. कोकणातलं पर्यटन वाढावं यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. कोकण ही महाराष्ट्राची पर्यटन पंढरी आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, आतापर्यंत कुठल्याही सरकारने दिला नाही इतका निधी सिंधुदुर्गला आपल्या सरकारच्या काळात दिला गेला. तसेच आगामी काळात राज्य सरकार महिला बचत गटांना चालना देणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मंत्रालयाकडे कोकणासाठी अनेक प्रकल्प आहेत. त्याचबरोबर दीपक केसरकरांच्या सर्व मागण्या आपल्या सरकारने मान्य केल्या आहेत. आपलं सरकार कोकणातल्या पर्यटनाची संधी सोडणार नाही. आंबोली येथे हिल स्टेशन उभारलं जाणार आहे. तसेच सिंधुदुर्गमधील चिपी विमानतळाला बॅ. नाथ पै यांचं नाव देण्याचा आपल्या सरकारचा निर्णय झाला आहे.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी आधीच्या महाविकास आघाडी सरकाला टोला लगावला. एकनाथ शिंदे म्हणाले, आपलं सरकार स्थापन व्हायच्या अडीच वर्ष आधी (मविआ सरकारच्या काळात) जे प्रकल्प थांबवले गेले होते किवा स्पीड ब्रेकर निर्माण केले गेले, ते आपण पुढे नेले. आमचं सरकार आल्यावर मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या मंत्रिमंडळाने हे स्पीडब्रेकर दूर केले. आम्ही विविध विकासकामांना चालना दिली. संपूर्ण राज्यभर युद्धपातळीवर वेगवेगळे प्रकल्प सुरू आहेत. ज्या राज्यांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे प्रकल्प सुरू असतात त्या राज्यांची प्रगती वेगाने होत असते.