माझ्या नादाला लागू नका, मला आडवे आलात तर मी कोणालाही सोडत नाही, असा जाहीर इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिला आहे. नागपूरच्या रामटेक येथे शिवसंकल्प अभियानांतर्गत आयोजित सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं. शिवसेनेच्या शिंदे गटाने आयोजित केलेल्या शिवसंकल्प अभियानाचा पुढचा टप्पा आज (रविवार, ११ फेब्रुवारी) नागपूर जिल्ह्यातील रामटेक लोकसभा मतदारसंघात पार पडला. यावेळी विरोधकांना चारीमुंड्या चित करून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी बसवण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रामटेकच्या सभेवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार कृपाल तुमाने, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार आशिष जयस्वाल, माजी मंत्री डॉ. दीपक सावंत, शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रामटेक परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही रामचरण स्पर्शाने पावन झालेल्या रामटेकमधील रामाचे दर्शन आधी घेणार आणि त्यानंतरच सगळे अयोध्येला जाणार. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार घेऊन आम्ही पुढे जात राहू.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, काही लोक म्हणतायत की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, पण राष्ट्रपती राजवट का आणि कशासाठी लावायची? सरकार कोणताही गुन्हा करणाऱ्याला पाठीशी घालणार नाही, तुमच्या काळात हनुमान चालीसा म्हटली म्हणून तुम्ही लोकांना तुरुंगात डांबलं, केंद्रीय मंत्र्याला जेवताना भरल्या ताटावरून उठवून अटक केली, गृहमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला, तरीही राष्ट्रपती राजवट लावली नाही, मग आता काय झालं?

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दाढीवरून केलेल्या टीकेलाही शिंदे यांनी यावेळी उत्तर दिलं. शिंदे म्हणाले, दाढी खेचून आणली असती… ही दाढी इतकी हलकी आहे का? या दाढीने जर काही काडी फिरवली तर तुमची उरली-सुरली लंकासुद्धा जळून खाक होईल. त्यामुळे माझ्या नादाला लागू नका. मी कोणाला आडवा जात नाही. परंतु, मला कोणी आडवा आला तर मी त्याला सोडतही नाही. कारण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांची मला शिकवण मिळाली आहे.

हे ही वाचा >> ‘योगी आदित्यनाथ यांचा अभ्यास कमी’, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विधानावरून अजित पवार गटाची टीका

एकनाथ शिंदे म्हणाले, मी घरात बसून काम करणारा मुख्यमंत्री नाही, तर रस्त्यावर उतरून काम करणारा आहे. शेतकऱ्यांशी संवाद साधणारा आहे, कार्यकर्त्यांना भेटणारा आहे, त्यांच्याशी बोलणारा आहे. मी फेसबूक लाईव्ह करणारा नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत भ्रष्टाचारामध्ये बुडालेल्या काँग्रेसला धडा शिकवायचा आहे. पुन्हा एकदा महायुतीचा झेंडा रामटेकवर फडकवायचा आहे. त्यामुळे जे घरी बसतात त्यांना कायमचे घरी बसवण्यासाठी ४५ हून अधिक खासदार महाराष्ट्रातून निवडून आणण्याचा शिवसंकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde slams uddhav thackeray over beard statement demand for president rule in maharashtra asc
Show comments