अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला. यावर वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अर्थसंकल्पाचं वर्णन ‘गाजर हलवा’ असं केलं, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतिक्रिया विचारली असता शिंदे म्हणाले की, “खरंतर आम्ही गाजर हलवा तरी देतोय, त्यांनी काहीच दिलं नाही. त्यांनी केवळ स्वतःचं खाल्लं, दुसऱ्याला काहीच दिलं नाही.”
शिंदे म्हणाले की, “मी या प्रतिक्रियेवर फारसं काही बोलणार नाही. कारण अर्थमंत्र्यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा वस्तुनिष्ठ आहे. यात आम्ही कोणतीही कोरडी आश्वासनं दिलेली नाहीत. याचे परिणाम दृष्य स्वरुपात आपल्याला आगामी काळात दिसतील. आम्ही आकडे फुगवण्याचं काम केलेलं नाही. हे शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी, तरुण आणि ज्येष्ठांचं सरकार आहे. या सर्वांचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आला आहे.”
शिंदे म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम आमच्या सरकारने केलं आहे. सर्व समाजघटकांना न्याय देण्याचं काम या अर्थसंकल्पात केलं आहे.” मुख्यमंत्री म्हणाले की, “शेतकऱ्यांसाठी राज्यात ‘नमो शेतकरी’ योजना सुरू करण्यात आली आहे. ही एक ऐतिहासिक योजना आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आधार मिळेल. राज्यातल्या आत्महत्या थांबवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.”
हे ही वाचा >> फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला; अजित पवारांचा राज्य सरकारला टोला
नमो शेतकरी योजनेचा १.१५ कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आता राज्यातील शेतकऱ्यांना १२,००० रुपये इतका सन्माननिधी दिला जाणार आहे. प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य सरकार देखील भर घालणार आहे. याद्वारे राज्यातल्या १.१५ कोटी शेतकरी कुटुंबांना लाभ मिळेल.