केंद्रातील मोदी सरकारविरोधात देशभरातील विरोधी पक्ष ‘इंडिया’ आघाडीच्या नेतृत्वाखाली एकत्र आले आहेत. ‘इंडिया’ आघाडीची तिसरी बैठक मुंबईत सुरू आहे. या बैठकीला देशभरातील २८ पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावली आहे. या बैठकीवर सत्ताधारी भाजपाकडून टीका सुरू आहे. तसेच एनडीएतील घटक पक्षांचे नेतेही इंडिया आघाडीला लक्ष्य करत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी इंडिया आघाडीवर तसेच मुंबईतल्या बैठकीचं यजमानपद भूषवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांच्या या आघाडीला इंडिया म्हणू नका. त्यांचं नाव I.N.D.I.A. असं आहे. या आघाडीत असलेले लोक हे स्वतःच्या स्वार्थासाठी एकत्र आले आहेत. स्वार्थापलिकडे त्यांना काही दिसत नाही. केवळ आपल्या कुटुंबाचं भलं करणं इतकंच त्यांना माहिती आहे. हे सगळे लोक मोदीद्वेषाने पछाडले आहेत. आतापर्यंत हे लोक स्वतःचा नेता जाहीर करू शकले नाहीत. स्वतःचा लोगो एकमताने जाहीर करू शकले नाहीत. यावरून त्यांची किती एकजूट आहे ते दिसतंय. हे प्रचंड स्वार्थाने पछाडलेले लोक आहेत. विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर पंतप्रधानपदासाठी एक उमेदवार उभा करू शकत नाहीत हेच त्यांचं सर्वात मोठं अपयश आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, केवळ स्वार्थासाठी ही टोळी एकत्र आली आहे. हे लोक भ्रष्टाचाराबद्दल बोलत आहेत, परंतु, यांना भ्रष्टाचारावर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांच्यातली कोणतीही नावं घ्या, लालू प्रसाद यादव, नितीश कुमार, अरविंद केजरीवाल या सगळ्यांवर भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल आहेत. यांनी अशा आघाड्या २०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी, २०१९ च्या निवडणुकीवेळी बनवल्या होता. परंतु, त्यावेळी त्यांचा सुपडा साफ झाला होता. २०२४ च्या निवडणुकीत जनता त्यांना घरचा रस्ता दाखवेल.
हे ही वाचा >> मोदी सरकारच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर अजित पवारांनी पहिल्यांदाच मांडली भूमिका, म्हणाले…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, हे लोक त्यांचा संयोजक किंवा लोगो ठरवू शकत नाहीत. ज्यांनी या बैठकीचं संयोजन केलं आहे ते स्वतःचा पक्ष सांभाळू शकले नाहीत. स्वतःच्या कार्यकर्त्यांना सांभाळू शकले नाहीत. ८० टक्के पक्ष दुसरीकडे गेला. त्यानंतर खरी शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता मिळाली. पक्षाचं चिन्ह म्हणजेच धनुष्यबाण आम्हाला मिळाला. आम्ही आता बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका घेऊन पुढे चाललो आहोत. हे लोक स्वतःचं कुटूंब संभाळू शकले नाहीत, ही आघाडी कशी काय सांभाळणार?