Eknath Shinde discuss with Narendra Modi : महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरील त्यांचा दावा सोडला आहे. त्यांनी आज (२७ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली. राज्यात महायुतीला मिळालेल्या निर्विवाद यशानंतर गेले दोन दिवस मुख्यमंत्रीपदावरून एकनाथ शिंदे आणि शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र भाजपाकडून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याच्या हालचाली पाहून शिंदे यांनी माघार घेतली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, “भाजपा व त्यांचं दिल्लीतील केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्रीपदाबाबात व नव्या सरकारबाबत जो काही निर्णय घेईल तो निर्णय मला व शिवसेनेला मान्य असेल”. तसेच शिंदे यांना यावेळी विचारण्यात आलं की नव्या सरकारमध्ये तुमची भूमिका काय असेल? त्यावर शिंदे म्हणाले, “उद्या दिल्लीत आमच्या तिन्ही पक्षांची बैठक होईल. त्या चर्चेत माझी महायुतीच्या सरकारमधील भूमिका ठरेल”.
एकनाथ शिंदे म्हणाले, “राज्यात आमचं बहुमताचं सरकार आलं आहे. तुम्ही प्रसारमाध्यमं आम्हाला विचारताय की सत्तास्थापनेचं घोडं कुठे अडलंय? मला तुमच्यासह राज्यातील जनतेला सांगायचं आहे की घोडं कुठेही अडलेलं नाही. मी मनमोकळा माणूस आहे. मी कुठेही काहीही धरून ठेवलेलं नाही. मी कुठलीही गोष्ट ताणून धरणारा माणूस नाही. मला इतर सर्व पदांपेक्षा लाडक्या बहिणींचा सख्खा लाडका भाऊ हीच ओळख पुरेशी आहे. त्यामुळे मी स्वतः काल (२६ नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला. त्यांना सांगितलं की सरकार बनवताना तुम्हाला माझ्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही. त्यामुळे माझ्याबद्दल मनात कुठलाही किंतू आणू नका. मागील वेळेस तुम्ही आम्हाला मदत केली. अडीच वर्षे राज्याचं नेतृत्व करण्याची संधी दिली. त्यासाठी मी आभारी आहे”.
हे ही वाचा >> “लोकसभेतील पराभवानंतर आम्ही…”, ईव्हीएममधील घोटाळ्याच्या आरोपांवर भाजपा नेतृत्त्वाची पहिली प्रतिक्रिया
एकनाथ शिंदे काय म्हणाले?
काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणाले, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना म्हणालो, महाराष्ट्रातील सत्तास्थापनेबाबत तुम्ही तुमचा निर्णय घ्या. नरेंद्र मोदी व अमित शाह भाजपासाठी महत्त्वाचे निर्णय घेतात. त्यांचा निर्णय आमच्यासाठी देखील अंतिम असेल. मी मोदींना आश्वस्त केलं की तुम्हाला कोणत्याही प्रकारचा निर्णय घेताना माझी अडचण वाटू देऊ नका. मी माझ्या मनातील भावना त्यांना सांगितल्या. त्यांना म्हटलं की सरकार बनवताना मनात माझ्याबद्दलचा अडसर ठेवू नका. तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य असेल. तो निर्णय शिवसेनेलाही मान्य असेल. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या बैठकीत जे काही ठरेल ते मला मान्य असेल”.