महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे. राज्यातील सरकारला जनतेची काळजी नसल्याचा आरोप करताना नाना पटोलेंनी पुन्हा एकदा शिंदे गटावर टीका करताना खोक्यांचा उल्लेख केलाय. इतकच नाही तर नाना पटोलेंनी शिंदे गटासंदर्भात बोलताना ३५०० कोटी रुपये खर्च केल्याचाही उल्लेख पत्रकार परिषदेत केला आहे.

नक्की वाचा >> नौदलाच्या ध्वजावर शिवरायांच्या राजमुद्रेची छटा : CM शिंदे म्हणाले, “हे महाराजांना अभिवादन” तर फडणवीस म्हणाले, “मोदींनी पारतंत्र्याची…”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय जनता पक्ष विरोधी पक्षांची सरकारे पाडण्यासाठी काळ्या पैशाचा वापर करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत केला. “महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ३५०० कोटी रुपये खर्च केल्याची चर्चा आहे. बंडखोरी केलेल्या काही आमदारांनी ५० कोटींची ऑफर असल्याचे सांगितले होते. हा काळा पैसा भाजपाकडे कुठून येतो याची सीबीआय, ईडीने चौकशी केली पाहिजे,” अशी मागणी पटोले यांनी केली आहे. राज्यातील जे आमदार गुवाहाटीला गेले होते त्यांच्याबद्दल लोकामध्ये आजही संभ्रम आहे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदेंनावरही नाना पटोलेंनी टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २०० आमदार निवडून आणण्याचा दावा करत आहेत पण फुटीर आमदारांच्या मतदार संघातच जनतेचा त्यांना प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे असेही पटोले म्हणाले.

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना राज्य सरकारकडून केवळ मदतीची घोषणा केली आहे, ही मदत अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. राज्यातील भाजपाप्रणित ईडी सरकार हे हिंदू हिताचा केवळ दिखावा करत आहे. प्रत्यक्षात हे सरकार शेतकरी विरोधी आहे. हिंदूंचे सरकार आले असून सण, उत्सव आनंदात साजरा करा असा डांगोरा पिटणाऱ्यांच्या राज्यातच हिंदू शेतकरी मात्र मदतीपासून वंचित आहे हा मोठा विरोधाभास आहे, असा आरोप पटोले यांनी शिंदे सरकारच्या धोरणांवर टीका करताना केला.

राज्यातील सध्याचे सरकार हे केवळ इव्हेंटबाज आहे, या सरकारला शेतकऱ्यांशी काहीही देणेघेणे नाही. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अजूनही मदत मिळालेली नाही, आजही पंचनामेच सुरु आहेत. शेतकऱ्यांबद्दल कळवळा दाखवण्यासाठी भाजपाच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी यवतमाळच्या एका गावातील शेतकऱ्याच्या घरी मुक्काम केला पण नंतर त्याच शेतकऱ्याने आत्महत्या केली, अशी टीका नाना पटोलेंनी केली आहे. तसेच पुढे बोलताना त्यांनी, “आजही कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांबद्दल सहानुभूती दाखवण्यासाठी एक कार्यक्रम जाहीर केला पण तो केवळ इव्हेंट आहे. अशा इव्हेंटमधून शेतकऱ्यांच्या समस्या दूर होणार नाहीत. कृषी मंत्री हा शेती व शेतकऱ्यांची जाण असणारा असायला हवा पण सध्याच्या कृषीमंत्र्यांबाबत तसे नाही. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचा शेतकऱ्यांशी काहीही संबंध नाही, त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख काय कळणार? एखादा इव्हेंट करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील असा त्यांचा दावा असेल तर तो साफ चुकीचा आहे,” असंही म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde supporters mla should face ed or cbi inquiry says nana patole by referring black money bjp and 3500 crore scsg
Show comments