मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील यांनी केलेल्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी केलेल्या भाषणात शिंदेंनी जयंत पाटलांच्या टीकेतील एक एक मुद्दा घेत त्यांच्यावर निशाणा साधला. “अजित पवार रोखठोक बोलतात, पण जयंत पाटील असं ऑपरेशन करतात की दुखत पण नाही. ते हसून सगळं काढून घेतात,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.
एकनाथ शिंदे म्हणाले, “शेतकऱ्यांना देखील आम्ही भरपूर दिलं. नैसर्गिक आपत्तीत जी तातडीची पाच हजार मदत दिली जात होती ती आपण १५ हजार केली. एनडीआरएफच्या मदतीची रक्कम दुप्पट केली, दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले. शेतकऱ्यांसाठी आम्ही काम केलं की नाही अजित पवार?”
“जयंत पाटील सरकारच्या कामासाठी बाक वाजवतात, पण…”
“तुम्ही प्रतिसाद तर दिला पाहिजे. जे चांगलं आहे ते चांगलं आहे. जयंत पाटील सरकारच्या कामासाठी बाक वाजवतात, पण त्यांनी काल सरकारविरोधात बरोबर वाजवत होते. ते गोड बोलून हसतहसत काम करतात. मंत्रिमंडळाचं खातेवाटपदेखील त्यांनी तसंच केलं होतं,” असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
“अजित पवार रोखठोक बोलतात, मात्र, जयंत पाटील…”
एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “अजित पवार रोखठोक बोलतात, मात्र, जयंत पाटील जे ऑपरेशन करतात ते दुखत पण नाही, कळत पण नाही. हसून काढून घेतात सगळं आणि माहितीही होत नाही. त्यांच्याकडून खूप अभ्यासपूर्ण भूमिकेची अपेक्षा होती, परंतु त्यांनी खूप टोमणे मारले.”
पाहा व्हिडीओ –
“राष्ट्रीय प्रवक्त्यांची जागा घेत आहेत की काय?”
“काल असं वाटत होतं की जयंत पाटलांना शिवसेनेत नेते किंवा उपनेतेपद दिलं आहे. त्याप्रमाणेच ते जोरदार बोलत होते. राष्ट्रीय प्रवक्ते नाहीत, तर ते राष्ट्रीय प्रवक्त्यांची जागा घेत आहेत की काय,” असा सवाल करत शिंदेंनी जयंत पाटलांवर निशाणा साधला लगावला.
“मशाल आहे घेतली हाती, आता खाली ठेवणे नाही
मार्ग सत्याचा असे धरला, आता मागे फिरणे नाही”
हे जयंत पाटील यांच्यासाठी आहे. आता मागे फिरणार नाही, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी जयंत पाटलांना आणखी एक टोला लगावला.