Ramdas Athawale on Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाले. भाजपा १३२, शिवसेना (शिंदे) ५७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) ४१ अशा २३५ जागा महायुतीला मिळाल्या आहेत. तरीही अद्याप सत्ता स्थापनेत अडचणी येत असून मुख्यमंत्री कोण होणार? यावरून महायुतीमध्ये वाद सुरू आहे. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्रीपदावर असावेत, यासाठी शिवसेनेकडून दबाव टाकला जात आहे. तर शिंदेंची मनधरणी करण्याचे प्रयत्न केंद्रातून केले जात आहेत. यादरम्यान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचे महत्त्वाचे विधान समोर आले आहे. त्यांनी एकनाथ शिंदेंना दोन पावले मागे येऊन केंद्रात मंत्री होण्याचा सल्ला दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय म्हणाले रामदास आठवले?

दिल्लीत संसदेच्या आवारात एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना रामदास आठवले म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले होते. त्यांचे ५७ आमदार निवडून आले आहेत. हा आकडा खूपच चांगला आहे. पण भाजपाचे १३२ आमदार निवडून आलेले आहेत. त्यामुळे भाजपा पक्षाने मुख्यमंत्रीपदावर दावा केला आहे. तसेच भाजपा पक्षश्रेष्ठींनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनविण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र एकनाथ शिंदे नाराज दिसत आहेत. त्यांची नाराजी दूर करण्याची गरज आहे.”

हे वाचा >> Live: ‘शिंदेंना दिल्लीत बोलविण्याचे अधिकार आठवलेंकडे नाहीत’, शिवसेनेचे प्रत्युत्तर

महायुतीच्या विजयात शिंदेंचा महत्त्वाचा वाटा

महायुतीच्या विजयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाचा वाटा होता. लाडकी बहीण योजना यशस्वी ठरली. त्याबद्दल त्यांचे अभिनंदनच केले पाहीजे. मात्र भाजपाकडे प्रचंड जागा आहेत. त्यामुळे भाजपा काही ऐकणार नाही. ज्याप्रमाणे २०२२ साली देवेंद्र फडणवीस चार पावले मागे आले होते. त्याप्रमाणे आता शिंदे यांनी दोन पावले मागे येण्याची आवश्यकता आहे, असेही रामदास आठवले म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदेंनी केंद्रात मंत्री व्हावे

“एकनाथ शिंदे यांनी एकतर उपमुख्यमंत्रीपद घ्यावे किंवा त्यांना उपमुख्यमंत्री व्हायचे नसेल तर त्यांनी केंद्रात येऊन मंत्रीपद घ्यावे. पंतप्रधान मोदी आणि अमित शाह नक्कीच त्यांचा विचार करतील. पण त्यांनी नाराजी दूर करून लवकरात लवकर निर्णय घेतला पाहीजे”, असेही रामदास आठवले म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde take two steps back says ramdas athawale advise him to take union minister post kvg