Eknath Shinde Targets Uddhav Thackeray: लांजा राजापूर मतदारसंघाचे माजी आमदार राजन साळवी यांनी नुकतेच शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर त्यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात प्रवेश केला. तीन वेळा लांजा राजापूर मतदारसंघाचे आमदार राहिलेल्या राजन साळवी यांच्या पक्ष प्रवेशावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. याचबरोबर बाळासाहेबांनंतर शिवसेनेत सहकाऱ्यांना नोकर-घरगड्यासारखी वागणूक मिळाल्याचेही म्हटले. दरम्यान राजन साळवी यांच्या प्रक्ष प्रवेश सोहळ्यास विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव करणारे किरण सामंतही उपस्थित होते.

हा कार्यकर्त्यांचा पक्ष

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आपण बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना पुढे नेत आहोत. इथे मालक-नोकर असे कोणी नाही. हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही आणि आताही कार्यकर्ता म्हणूनच काम करत आहे. त्यामुळे या पक्षात जो काम करेल तो पुढे जाईल.”

नोकर-घरगड्यासारखी वागणूक

यावेळी एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर नाव घेता टीका केली. याचबरोबर अडीच वर्षांपूर्वी का उठाव केला याबाबतही भाष्य केले. ते म्हणाले, “मी बाळासाहेबांबरोबर काम केले आहे. ते आपल्या सहकाऱ्यांना सवंगड्यांसारखे वागवायचे. पण नंतर त्यांच्या पश्चात सहकाऱ्यांना नोकर-घरगड्यासारखी वागणूक दिली गेली. त्यामुळेच या एकनाथ शिंदेला अडीच वर्षांपूर्वी या राज्यामध्ये एक उठाव करावा लागला आणि लोकांच्या मनातील सरकार आणावे लागले.”

राजन साळवी भावूक

माजी आमदार राजन साळवी यांचा शिवसेना (एकनाथ शिंदे) प्रवेश सोहळा ठाण्यातील आनंद दिघे यांच्या आनंदाश्रमात पार पडला. यावेळी बोलताना राजन साळवी म्हणाले, “मी स्वत:ला नशीबवान समजतो, कारण ही पवित्र जागा आहे. आनंद दिघे यांच्या स्पर्शाने ही जागा पवित्र झाली आहे. आज माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आहेत. ३८ वर्षे शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादाने शिवसेनेत काम करताना नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हाप्रमुख, २००९, २०१४, २०१९ असे तीन वेळा आमदार होऊ शकलो, त्यानंतर शिवसेना उपनेता झालो. या संपूर्ण वाटचालीत सर्वसाधारण कुटुंबातील सदस्य एवढ्या मोठ्या पदावर पोहचला आणि तो पक्ष मला आज मागे टाकून आता मला नवीन प्रवाहामध्ये यावे लागत आहे.”

Story img Loader