मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. खोका खोका करणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत मोठा धक्का दिला आहे. ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है, असा चिमटा एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना काढला आहे. नाशिकमधील ५१ सरपंच आणि सदस्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. तेव्हा एकनाथ शिंदे बोलत होते.

“प्रवेश केलेल्या सरपंचांच्या ग्रामपंचायतीसाठी कोणताही निधी कमी पडू दिला जाणार नाही. हे सरकार सर्वसामान्य लोकांचे आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना न्याय देणारे हे सरकार आहे. या सरकारच्या माध्यमातून तीन महिन्यांत ७२ मोठे निर्णय घेतले आहेत. अतिवृष्टीने झालेल्या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना ६ हजार कोटी रुपये देण्यात येणार आहे,” असेही एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

हेही वाचा : बुलडाण्यातील शिवसैनिकांना ‘मातोश्री’वर भेट नाकारली, भातखळकरांचा उद्धव ठाकरेंना चिमटा; म्हणाले, “हा तर अंधेरी…”

“गेल्या दोन तीन दिवसांत परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालं आहे. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. निकषात न बसणाऱ्यांचेही पंचनामे युद्धपातळीवर सुरु आहेत. पेट्रोल, डिझेलचे पैसे कमी करण्याचे धाडस आमच्या सरकारने केले. शिक्षक, महिला, शाळांसाठी सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. समुद्रात जाणारे पाणी दुष्काळी भागाला वळवण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे,” असेही एकनाथ शिंदे म्हणाले.