MNS Gudi Padwa Melava 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे. मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. त्यावर आज पडदा पडला आहे. राज ठाकरे यांनी महायुतीला लोकसभे निवडणुकीत बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे. फक्त नरेंद्र मोदींच्या कणखर नेतृत्वासाठी मी भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना बिनशर्त पाठिंबा देत आहे असं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी लोकसभा लढवणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. राज ठाकरे यांची मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नसली तरी राज यांनी महाराष्ट्र सैनिकांना विधानसभेच्या तयारीली लागण्याचे आदेश दिले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “हिंदुत्वासाठी राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे.” राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांना विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेशही दिले आहेत. यावर एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांचं बरोबर आहे. त्यांचा एक पक्ष आहे आणि प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. आता लोकसभा निवडणूक होऊ द्या. लोकसभा निवडणूक झाल्यावर आपण विधानसभेचं पाहू.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मी राज ठाकरे यांच्या निर्णयाचं स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आपला देश वेगाने पुढे जातोय. त्यांच्या नेतृत्वात देशाचा विकास झाला आहे. मोदींनी आपला देश पुढे नेला आहे. त्यामुळेच राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.

हे ही वाचा >> “शिंदे-फडणवीस मला सतत…”, राज ठाकरेंनी सांगितलं अमित शाहांची भेट घेण्याचं कारण

काय म्हणाले राज ठाकरे?

राज ठाकरे म्हणाले, “मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचाच अध्यक्ष राहणार. तुमच्या सगळ्यांच्या विश्वासावर मी हा पक्ष उभा केला आहे. त्याला १८ वर्ष झाली आहेत. कुठल्या पक्षाचा प्रमुख होणार ही गोष्ट माझ्या मनाला शिवतही नाही. मी मनसे नावाचं हे आपत्य जन्माला घातलं आहे आणि मी ते वाढवणार आहे” असं म्हणत राज ठाकरेंनी शिवसेना ताब्यात घेणार का? या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. राज ठाकरे म्हणाले “जागावाटपावरही चर्चा झाली. मात्र मी त्यावर बोलणं टाळलं. त्याचबरोबर मी रेल्वेचं इंजिन या मनसेच्या निवडणूक चिन्हाव्यतिरिक्त कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढण्यास स्पष्टपणे नकार दिला.

मनसे अध्यक्ष म्हणाले, “नरेंद्र मोदींकडून देशाला अपेक्षा आहेत. आज या जगात सर्वात तरुण देश असेल तर तो आपला भारत देश आहे. सर्वाधिक तरुण सध्या भारतात आहेत. या तरुणांना-तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. तंत्रज्ञानाची गरज आहे. त्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काम केलं पाहिजे. आणखी १० वर्षांनी हा देश वयस्कर व्हायला लागणार. माझी मोदींकडून अपेक्षा आहे की भारतातल्या तरुणांकडे लक्ष द्या. भारताचं भविष्य हेच तरुण-तरुणी आहेत. प्रत्येक देशाचा एक काळ असतो. जपानमध्ये एक काळ होता. अनेक कंपन्या तिथे उभ्या राहिल्या. अनेक व्यवसाय उभे राहिले. घुसळून निघाला तो देश, असा आपला देश घुसळून निघाला पाहिजे. तसं जर घडलं नाही तर सगळ्याच गोष्टींवरचा समाजाचा विश्वास उडून जाईल, देशात अराजक येईल” असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde thanked raj thackeray for supporting nda in maharashtra lok sabha election 2023 asc