Eknath Shinde to Become Deputy Chief Minister : “महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांना सन्मान मिळाला पाहिजे असं मी देवेंद्र फडणवीस यांना सांगितलं आहे”, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. तसेच, “एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री करून त्यांना सन्मान देणार असल्याचं फडणवीसांनी मला सांगितलं आहे”, असंही आठवले म्हणाले. यासह केंद्रीय राज्यमंत्र्यांनी त्यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षासाठी फडणवीसांकडे महाराष्ट्राच्या नव्या सरकारमध्ये एक मंत्रीपद मागितलं आहे. आठवले यांनी स्वतःच याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला नव्हता त्या काळात आठवले यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांसमोर सातत्याने देवेंद्र फडणवीसांची बाजू मांडली होती. फडणवीस पुढचे मुख्यमंत्री व्हायला हवेत, अशी भूमिका त्यांनी अनेकदा मांडली. त्यापाठोपाठ आता आठवले आता एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जावं यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.
रामदास आठवले म्हणाले, “एकनाथ शिंदे यांना सन्मान मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि मी ती देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली आहे. त्यानंतर फडणवीस यांनी मला सांगितलं की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील. महायुतीत त्यांना योग्य सन्मान मिळेल आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नसतील तर त्यांना महायुतीचं अध्यक्षपद किंवा संयोजकपद द्यावं असंही मी सुचवलं आहे. शेवटी एकनाथ शिंदे यांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. एकनाथ शिंदे यांच्यामुळे महायुतीला इतका मोठा विजय मिळाला आहे. त्यामुळे त्यांचा आदर राखणं आवश्यक आहे, ही भूमिका मी मांडली आहे. यासह मी आरपीआयसाठी एका मंत्रीपदाची मागणी केली आहे”.
भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांनी बुधवारी (४ डिसेंबर) देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेता म्हणून निवड केली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी अभिनंदन केले. याचबरोबर महायुतीचा घटक असल्यामुळे रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियालाही (आठवले) मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.
हे ही वाचा >> Vinayak Raut : “महायुतीत एकनाथ शिंदेंची गरज आता संपली आहे, गरज असेल तर..”; ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्याची टीका
काय म्हणाले रामदास आठवले?
दिल्लीत सध्या संसदेचे अधिवेशन चालू आहे. यावेळी संसदेबाहेर एएनआयशी बोलताना रामदास आठवले म्हणाले, “भाजपाच्या विधीमंडळ नेतेपदी निवड झाल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन. फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून कामाचा मोठा अनुभव आहे. ते एक सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे ते उत्तम काम करतील. मी नुकतीच अमित शाह यांची भेट घेत होती. या भेटीत त्यांना सांगितले आहे की या निवडणुकीत महायुतीला दलितांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात आरपीआयलाही स्थान मिळायला हवं. अमित शाह यांनी यावर विचार करतो असा शब्द दिला आहे”.