पहाटेच्या शपथविधी प्रकरणाची शरद पवारांना माहिती होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केला आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसने देखील फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार म्हणाले की, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधीच फडणवीस यांनी ठामपणे सांगितलं होतं की, राष्ट्रवादीसोबत युतीच काय साधी चर्चादेखील करणार नाही. मग २०१९ च्या निवडुकीनंतर काय बदललं. फडणवीस अशी दुटप्पी भूमिका का मांडत आहेत असा प्रश्न पडला आहे. त्यांची कुठेतरी गल्लत होत आहे असं मला वाटतं.
रोहित पवार म्हणाले की, शिवसेना जेव्हा फुटली तेव्हादेखील फडणवीस म्हणाले होते की, शिवसेना फोडण्यात आमचा काहीच रोल (भूमिका) नाही. परंतु भाजपा आणि शिंदे गटाने सरकार स्थापन केल्यावर विधानसभेत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना सांगितलं की, शिवसेना फोडण्यात कोण कलाकार होते. त्यानंतर फडणवीस यांनी स्वतः स्वीकारलं की, बदला घेण्यासाठी आम्ही शिवसेना फोडली. फडणवीसांसारख्या मोठ्या नेत्याची दुटप्पी भूमिका समोर येते, तेव्हा मला आश्चर्य वाटतं. टीव्ही ९ मराठीशी बातचित करताना रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.
हे ही वाचा >> “निवडणुकीत शिंदे गटाचा फायदा होणार नाही…” रोहित पवारांनी सांगितलं फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्याचं टायमिंग
नागरिकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न
महाविकास आघाडीचे नेते त्यांच्याविरोधात कारवाई करणार असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. परंतु त्यात काही तथ्य नाही. केवळ नागरिकांची सहानुभूती मिळवण्याचा ते प्रयत्न करत आहेत. कारण आगामी निवडणुकीत त्यांना शिंदे गटाचा काही फायदा होईल असं दिसत नाही. त्यांच्या सर्वेमध्ये ही गोष्ट लक्षात आली असावी, त्यामुळे ते सहानुभूती मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत.