सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवारी) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल दिला आहे. महाराष्ट्रात सत्तांतर घडत असताना घडलेल्या विविध घटनांवर न्यायालयाने भाष्य केलं आहे. यावेळी न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे सर्व निर्णय बेकायदेशीर आणि चुकीचे होते, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्याचबरोबर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचंही न्यायालयाने सांगितलं.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर आजची राजकीय स्थिती वेगळी असती. सध्याच्या मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यायला लावणं, योग्य नाही, असंही न्यायालयाने म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्र सोडलं. एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षणे उद्धव ठाकरेंचा उल्लेख ‘संधीसाधू’ असा केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे ट्वीटमध्ये म्हणाले, “अखेर सत्याचा विजय झाला आहे. हा निकाल जनमताचा मान ठेवणारा आहे. घराणेशाही विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय आहे. न्यायालयाने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेबांच्या विचारधारेशी प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्याला चपराक दिली आहे. हा निर्णय मतदारराजाचा सन्मान करणारा आहे. हा शिवसेना वाचवण्यासाठी केलेल्या संघर्षाचा विजय आहे.”
हेही वाचा- Supreme Court Verdict: उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया, म्हणाले…
“यापुढे जनमताची फसवणूक करणारे पक्ष सत्तेसाठी आपला आत्मा विकण्याचे धाडस करणार नाहीत. सत्तेसाठी आणि मुख्यमंत्रीपदासाठी नितीमत्ता सोडणाऱ्यांनी नितीमत्तेची भाषा करू नये” असा अप्रत्यक्ष टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.