Eknath Shinde Slams Uddhav Thackeray: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा काल नाशिकमध्ये कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्याबरोबर गेलेले आमदार आणि भाजपासह महायुती सरकारवर जोरदार टीका केली. यावेळी ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता, मला दुसऱ्यांचे वडील चोरायची गरज नाही असे म्हटले होते.
यानंतर पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी, “सगळ्या पक्षांना आज हिंदूदृदय सम्राटांशिवाय पर्याय नाही. पण, काही चोरही माझ्या आजोबांचा फोटो वापरत आहेत. त्यांना त्यांच्या वडिलांचा फोटो वापरायला लाज वाटते”, असे म्हटले होते.
आता उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या या टीकेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पत्रकारांशी बोलताना एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे काही जुने व्हिडिओ दाखवत ठाकरेंना लक्ष्य केले. यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, “कालही बाप चोरला, बाप चोरला हे रडगाणं चालू होतं. आम्ही बाप चोरला नाही. तो कायम हृदयात पुजला आणि यापुढेही पुजत राहू. पण, तुम्ही पाप झाकण्यासाठी त्यांचा आवाज चोरला, त्यांचे विचार चोरले आणि हे विचार चोरण्याचे पाप आम्ही नाही तुम्ही केले आहे.”
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी यावेळी बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ दाखवला. त्यामध्ये बाळासाहेब, ते कधीही काँग्रेसबरोबर जाणार नसल्याचे म्हटल्याचे ऐकू येत आहे. याचबरोबर व्हिडिओमध्ये बाळासाहेब असेही म्हणताना ऐकू येते की, जेव्हा काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ येईल तेव्हा राजकारणातून बाहेर जाईन.
एकनाथ शिंदे यांनी पुढे बाळासाहेब ठाकरे यांचा आणखी एक व्हिडिओ दाखवला. त्या व्हिडिओमध्ये बाळासाहेब, “एकनाथ शिंदे यांच्यासारखी माणसं आनंद दिघे यांनी तयार केली आहेत. ते आनंद दिघे यांच्या तालमीत तयार झाले आहेत.”
दरम्यान काल नाशिकमध्ये झालेल्या शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) कार्यकर्ता मेळाव्यात विशेष व्हिडिओद्वारे बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील भाषण दाखवण्यात आले. या भषणामध्ये राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आहे होते. याचबरोबर यामध्ये एकनाथ शिंदे, त्यांच्याबरोबर गेलेले आमदार, नरेंद्र मोदी आणि भाजपावर जोरदार टीका करण्यात आली आहे.