मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या जुहूतील ‘अधिश’ या निवासस्थानी जाऊन गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणेही उपस्थित होते. या भेटीनंतर राणे यांच्या घराबाहेरच दोन्ही नेत्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री शिंदे यांनी राणेंसोबतच्या भेटीमध्ये काय चर्चा झाली याबद्दलची माहिती दिली.

राणेंच्या घराबाहेर आल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ शिंदेंनी ही एक सदिच्छा भेट असल्याची माहिती दिली. “मी आज इथे दर्शनला आलो. भेटल्यानंतर जुन्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळतो. ते मुख्यमंत्री असतानाचे अनुभव त्यांनी सांगितलं. शेवटी हे जनतेचं सरकार आहे, सर्वसामान्यांचं सरकार आहे. सर्वसामान्यांसाठी जे काही चांगलं करता येईल त्याबद्दल चर्चा झाली. बाळासाहेबांच्या तसेच आनंद दिघेंच्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येक वेळेस राजकीय बोललं पाहिजे असं काही नाही ना?” असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. “राजकीय काही चर्चा केलेली नाही आपण”, असं शिंदे बाजूला उभ्या असणाऱ्या नारायण राणेंकडे पाहून म्हणाले. त्यावर राणेंनी हसून, “करत पण नाही” असं उत्तर दिलं.

“सदिच्छा भेट होती. गणपती दर्शनसाठी आलो होतो. कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. आम्ही पूर्वी बाळासाहेब ठाकरेंसोबत काम केलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत करत आम्ही इथपर्यंत आम्ही पोहोचलो,” असंही शिंदे म्हणाले. एवढ्या कमी वेळात आम्ही किती निर्णय घेतले आहेत लोकांच्या हिताचे हे तुम्ही पाहिलं आहे, असंही शिंदे यांनी म्हटलं. हे निर्णय आणि जास्तीत जास्त लोकहिताचे निर्णय घेण्यासंदर्भात चर्चा झाल्याचं शिंदे म्हणाले.

या भेटीदरम्यान शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर, आमदार कालिदास कोळंबकर, समन्वयक आशिष कुलकर्णी आणि राणे कुटूंबीय उपस्थित होते.

Story img Loader