दसरा अवघ्या काही आठवड्यांवर आलेला असतानाच मुंबईतील दादरमधील शिवतीर्थावर यंदाचा दसरा मेळावा कोण घेणार यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील फुटीर आमदारांचा गट विरुद्ध उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना असे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. दोन्ही बाजूने आम्हीच यंदा दसरा मेळावा घेणार असं सांगितलं जात आहे. असं असतानाच आता या वादामध्ये आपल्या हटके विधानांसाठी लोकप्रिय असणारा अभिनेता अभिजित बिचुकलेने उडी घेतली आहे. कोणीही कोणत्याही नेत्याच्या दसरा मेळाव्यासाठी जाऊ नये असं आवाहन केलं आहे. इतकच नाही तर यावेळी बिचुकलेने मुख्यमंत्री शिंदेंचा उल्लेख “आता कोण दुसरे आलेत” असा केला आहे.
साताऱ्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना बिचुकले यांना दसरा मेळाव्यासंदर्भातील त्याचं मत काय आहे असं विचारण्यात आलं. या प्रश्नाला उत्तर देताना, “दसरा मेळाव्याबद्दल मी एकच सांगेन, सदविवेक बुद्धी असणाऱ्या कुठल्याही व्यक्तीने कोणत्याही नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी घराबाहेर पडू नये. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या हा सण तुम्ही तुमच्या घरी कुटुंबियांबरोबर, समाजाबरोबर आणि मित्र तसेच सहकाऱ्यांसोबत साजरा करा,” असं आवाहन बिचुकले यांनी केलं.
पुढे बोलताना बिचुकले यांनी कोणाचाही थेट उल्लेख न करताना मेळावे घेणाऱ्या राजकारण्यांवर टीका केली. “हे जे लोक कोल्हेकुई करतात, नालायकपणा करतात त्यांचे विचार सांगून स्वत:ची खळगी भरतात. त्यांच्या नातवंडांपर्यंत ते सुखी राहतात,” असं बिचुकले म्हणाले. इतकच नाही तर बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षपणे टोलाही लगावला. “आता कोण दुसरे आलेत ते ही दसरा मेळावा घ्या म्हणायला लागले आहेत,” असं बिचुकलेंनी म्हटलं.
त्याचप्रमाणे आपण आता सणासुदीचे दिवस सोडून मेळावे घेणार असून महाराष्ट्रातील समाजाच्या भल्यासाठी काम करणार असल्याचंही बिचुकले म्हणाले. “मी कधीही दसरा मेळावा करणार नाही. मी दसरा, दिवाळी, गुडीपाडवा हे सोडून माझे मेळावे घेईन. आता माझी वेळ आली महाराष्ट्रासाठी काहीतरी करण्याची. प्रत्येकाचा काळ असतो. सर्वांचा काळ गेला. आता अभिजित बिचुकले येईल. एखाद्या धर्माच्या, जातीच्या किंवा प्रांताच्या नाही तर या सर्व समाजासाठी काम करेन,” असं बिचुकले म्हणाले.