Eknath Shinde and Devendra Fadnavis Rift : राज्यातील महायुती सरकारमधील शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षात दरी वाढत असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. यादरम्यान शिनसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला जाणे टाळल्याच्या मुद्द्यावर बोलताना एकनाथ शिंदे यांनी २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्याचा संदर्भ देत त्यांना हलक्यात घेऊ नका असा इशारा दिला आहे.
शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात मंजूर झालेल्या जालन्यातील ९०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी हे विधान केले आहे. या प्रकल्पाच्या वैधतेबाबत आणि शिंदे यांच्या मंजुरीमागील हेतूंबाबत प्रश्न उपस्थित होत असताना हे चौकशीचे आदेशही देण्यात आले आहेत.
शिंदे नेमकं काय म्हणाले?
माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, “मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. मात्र मी बाळासाहेब आणि दिघेसाहेब यांचा कार्यकर्ता देखील आहे आणि प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे. मला जेव्हा हलक्यात घेतले तेव्हा २०२२ मध्ये टांगा पलटी केला. सरकार बदललं, सामान्य नागरिकांच्या मनातील सरकार तेथे आणलं. जे लोकांना हवं होतं ते डबल इंजिनचं सरकार तेथे आलं. म्हणून मला हलक्यात घेऊ नका, हा इशारा ज्यांना समजून घ्यायचा आहे त्यांनी घ्यावा”.
२०२२ मध्ये शिवसेनेच्या ४० आमदारांसह एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत फूट पडली आणि महाविकास आघाडी सरकारवर कोसळले होते. नंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत सरकार स्थापन केले आणि त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले.
मात्र काही दिवसांपूर्वी झालेल्या २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने जिंकलेल्या एकूण २३० जागांपैकी १३२ जागा भाजपाने जिंकल्याने एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मुख्यमंत्री पद सोडले. तेव्हापासूनच मुख्यमंत्री पद न मिळाल्याने शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
मला हलक्यात घेऊ नका
हलक्यात न घेण्याच्या इशार्याबाबत बोलताना शिंदे पुढे म्हणाले की, “माझ्या विधानसभेतील पहिल्या भाषणात मी म्हणालो होतो की देवेंद्र फडणवीस यांना २०० हून जास्त जागा मिळतील, आणि आम्हाला २३२ जागा मिळाल्या. त्यामुळे मला हलक्यात घेऊ नका. हे ज्यांच्यासाठी आहे त्यांच्या हे लक्षात येईल.” सध्या विधानसभेत एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे ५७ आमदार आहेत तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ४१ आमदार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार शिंदे आणि फडणवीस हे गेल्या काही दिवसांपासून एका मंचावर येणे टाळत आहेत. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांनी बोलवलेल्या अनेक बैठकांना जाणेही टाळल्याचे पाहायला मिळत आहे. या दोन नेत्यांनी सचिवालयात वेगवेगळे वैद्यकीय सहाय्य कक्ष देखील स्थापन केले आहेत. यामुळे महायुतीत सत्तासंघर्ष वाढला असल्याचे बोलले जात आहे.
रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा देखील अद्याप सुटलेला नाही, यावरून देखील सध्या महायुतीत रस्सीखेच पहायाला मिळत आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी कसल्याही प्रकारचे कोल्ड वॉर सुरू नसल्याचे म्हटले आहे. विकासाला विरोध करणार्याविरूद्ध आम्ही एक आहोत असेही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.