Eknath Shinde Family : राज्यातील विधानसभा निवडणुकीला दिवसेंदिवस रंगत येत असून उमेदवारी अर्ज भरण्यास वेग आला आहे. २९ ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अनेकांनी २८ ऑक्टोबर रोजी अर्ज भरले. यावेळी अनेकांनी मोठं शक्तीप्रदर्शनही केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ठाण्यात शक्तीप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या पत्नी आणि सूनबाईही प्रचाराला हजर होत्या. एकमेकींचं कौतुक करत त्यांनी एकनाथ शिंदे यांना निवडून आणण्याचं आवाहन जनतेला केलं. टीव्ही ९ च्या मुलाखतीत दोघी बोलत होत्या.
“जनतेला हाच भाऊ पुन्हा हवाय. मोठ्या मताधिक्याने एकनाथ शिंदे पुन्हा आमदार होतील. एकनाथ शिंदे कायम कामातून उत्तर देतात. त्यामुळे ते बहुमताने निवडून येतील”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या की, “नवऱ्याच्या पाठी महिलेने खंबीर उभं राहावं, आपण मेहनत केली तर त्यांना ताकद मिळेल.” लाडक्या बहिणीची दिवाळी आता खुशीत, आनंदात आणि जोरदार राहणार असल्याचंही त्या आवर्जुन म्हणाल्या.
ही माझी सून नाही, लेक आहे
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शक्तीप्रदर्शनात लता शिंदे यांच्याबरोबर त्यांच्या सून म्हणजेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदेही हजर होत्या. या प्रचारसभेत त्यांना त्यांच्या घरातील वातावरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या सूनबाई वृषाली शिंदे म्हणाल्या, “आमच्यात सासू सुनेची भूमिका नसते. ही माझी आई आहे, आम्ही माय-लेकीसारखं राहतो. आपण ज्या घरी जातो त्या घरी लेक म्हणून जायचं. सासूही आपल्याला मुलगी म्हणून स्वीकारते. असंच आमचं नातं आहे”, असं त्या सांगत असतानाच एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लागलीच म्हणाल्या, “ही माझी सून नाही, तर माझी मुलगी आहे.”
एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पारपंरिक कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला आहे. २००९ पासून ते या मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. तसंच, २००४ साली ते ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. म्हणजेच, यंदा ते पाचव्यांदा निवडणुकीचा अर्ज भरत आहेत.